मुंबई : गेल्या ९३ वर्षांपासून नागरीकरणाच्या बळकटीकरणासाठी काम करणाऱ्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्य कौतुकास्पद व अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अंधेरीत काढले. या संस्थेच्या दीक्षान्त समारंभाचे प्रमुख म्हणून ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख होते.
मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना प्रशिक्षण देणे, महानगरपालिका, नगरपालिका यांच्यासाठी सॅनेटरी इन्स्पेक्टर, नर्सिंग, फायर ऑफिसर, एलएसजीडी, एलजीएस व अन्य अभ्यासक्रम तसेच केंद्र व राज्य सरकारच्या नागरीकरणाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे काम ही संस्था करीत आहे.
कोविड काळात पहिली व दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या राज्यातील महापालिका व नगरपालिका कोविडयोद्धा कर्मचाऱ्यांचा मंत्री एकनाथ शिंदे यांनी गौरव केला. वाढत्या नागरीकरणाचा विचार करता स्थानिक संस्था बळकट करणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या संस्थेमधून प्रशिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात उपयोग होतो, त्यांची कार्यक्षमता वाढल्याने त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांना होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख म्हणाले, महानगरपालिका आणि नगरपालिका येथील लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ही एक फॅक्टरीच आहे. अनेक प्रशासकीय अधिकारी आणि नावाजलेली व्यक्तिमत्त्वे या संस्थेतून प्रशिक्षण घेतल्याने निर्माण झाली आहेत. मी नगरसेवक असताना या संस्थेतून मला प्रशिक्षण मिळाले आणि त्याचा मला फायदा झाला आणि आज मी मंत्री म्हणून कार्यरत आहे, असे ते म्हणाले.
या वेळी मंत्री महोदयांच्या हस्ते संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांतील यशस्वी विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या वेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष रणजीत चव्हाण, महासंचालक राजीव आगरवाल, संस्थेचे वरिष्ठ सल्लागार जयराज फाटक, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय साने, नाशिक मनपाचे विरोधी पक्षनेते अजय बोरास्ते आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी हातभार
या संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून जमा केलेला दोन लाखांचा निधी मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी मंत्रीमहोदयांकडे सुपुर्द करण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष रणजीत चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संस्थेचे वरिष्ठ सल्लागार जयराज फाटक यांनी सर्वांचे आभार मानले. स्मिता गवाणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.