मुंबई : राष्ट्राला समृद्ध आणि संपन्न बनविण्यासाठी आपल्या देशातील सव्वाशे कोटी जनतेची पावले एकाच दिशेने पडणे गरजेचे आहे; तरच आपल्या देशाची प्रगती वेगाने होऊ शकेल. समाजातील प्रत्येक गटाने अथवा संस्थेने समोर उद्दिष्ट्ये ठेऊन कार्य केले, तर समाजात निश्चित बदल घडेल, असा आशावाद ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केला.मैत्रेयचे संस्थापक मधुसूदन सत्पाळकर यांच्या अकराव्या स्मृतीदिनाप्रसंगी आयोजित ‘एक पाऊल राष्ट्रासाठी’ या परिसंवादात ते बोलत होते. याप्रसंगी ‘मैत्रेय सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे काम करणाऱ्या चैतन्य परिवारातील सुधाताई कोठारी यांनी काकोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा सन्मान माझा नसून, बचत गटांच्या माध्यमातून माझ्याशी निगडीत असणाऱ्या सर्व महिलांचा आहे, अशी भावना कोठारी यांनी या वेळी व्यक्त केली. ‘एक पाऊल राष्ट्रासाठी’ या विषयावरील परिसंवादात अर्थतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर टिळक यांनी योग्य बचत, गुंतवणुकीचे महत्त्व विशद करीत स्वावलंबनाचा संदेश आजच्या पिढीला दिला. शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज असून, खेड्यांमध्ये अजूनही सुविधांचा अभाव असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
उद्दिष्ट समोर ठेवून कार्य करावे - काकोडकर
By admin | Updated: October 15, 2014 23:20 IST