Join us  

तमाशा कलावंत शांताबाईंच्या दयनीय अवस्थेची महिला आयोगाकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 5:02 PM

शांताबाई यांना मदत करण्यासाठी संबंधित महिला व बाल कल्याण विभागाला सूचना दिल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.  

मुंबई - तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांचा अहमदनगरच्या कोपरगाव बस स्टँडवरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर लोकांच्या अनेक संवेदनशील कमेंट येत असून शासनाने या कलावंताना मदत करायला हवी, अशी मागणीही केली जात आहे. आता, शांताबाई कोपरगावकर यांची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटर अकाऊटंवरुन यासंदर्भात माहिती दिली. तसेच, शांताबाई यांना मदत करण्यासाठी संबंधित महिला व बाल कल्याण विभागाला सूचना दिल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.  

तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर या ज्येष्ठ मराठी कलाकारावर उतारवयात दयनीय अवस्थेत राहण्याची वेळ आली आहे, अशा आशयाच्या बातम्या माध्यमातून समोर आल्या आहेत. आयोगाच्या वतीने तातडीने जिल्हा महिला बालविकास अधिकारी अहमदनगर यांना संपर्क करण्यात आला आहे. सध्या शांताबाई नगरच्या एका रुग्णालयात आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांची महिला बाल विकास विभागामार्फत वृद्धाश्रमात व्यवस्था करावी असे जि. म.बा. अहमदनगर यांना सांगण्यात आल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले. 

महाराष्ट्र शासनाने कलाकारांच्या निवृत्ती वयात त्यांना समाधानाने जगता यावे यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत. शांताबाईंना राज्य शासनाच्या योजनांमधून सन्मान जनक मानधन मिळावं, निवृत्ती वेतन मिळावं यासाठी  आयुक्त, महिला बाल विकास यांना पत्र लिहून शांताबाईंना मदत मिळवून देण्यासाठीचे निर्देशही आयोगान दिले आहेत. याससंदर्भात स्वत: चाकणकर यांनी माहिती दिली. 

कोण आहेत शांताबाई कोपरगांवकर ?

एकेकाळची लावणी सम्राज्ञी म्हणजे शांताबाई कोपरगांवकर. ज्यांच्या अदाकारीने लालबाग परळचं हनुमान थिएटर वन्स मोअर, टाळ्या आणि शिट्यांनी गाजलं होतं. ज्यांच्या अदाकारीने आणि सौंदर्यानं चाळीस वर्षांपूर्वी अनेक तमाशा रसिकांना घायाळ केलं, ती महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी आता मात्र रस्त्यावर भीक मागतेय. बस स्थानकच तिचं घर झालं असून अत्यंत बिकट अवस्थेत ती जगत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव बस स्टँडवरील या कलावंताचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर, सोशल मीडियातून या शांताबाईंसाठी सरकारने मदत करावी, ्अशी मागणी होऊ लागली. 

अशिक्षित असलेल्या शांताबाईची तमाशा मालकाकडून फसवणूक झाली. मालकाने सर्व तमाशा विकून टाकला आणि शांताबाई उद्धवस्त झाल्या. त्यांना मानसिक आजाराने ग्रासलं, त्या उद्विग्न अवस्थेत भीक मागू लागल्या. पती नाही, ना कुणी जवळचं नातेवाईक. कोपरगाव बसस्थानकच शांताबाईचं घर झालंय. मात्र, आता महिला आयोगाने त्यांची दखल घेत मदतीच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. 

टॅग्स :मुंबईरुपाली चाकणकरमहिलामहिला आणि बालविकास