Join us

कार दुभाजकाला धडकून महिला ठार

By admin | Updated: May 21, 2015 00:02 IST

चौघे गंभीर : अतीतजवळ अपघात; जखमींचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

काशीळ : पुणे-बेंगलोर महामार्गावर अतीत गावाजवळ भरधाव वेगात असलेल्या ‘वॅगन आर’ कारच्या चालकाच ताबा सुटल्याने दुभाजकाला धडकून कार पुढे पुलाच्या कठड्याला धडकली. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली, तर चार जण गंभीर जखमी झाले. अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. मालन शिवाजी मदने (वय ६०, मूळ रा. येतगाव, ता. कडेगाव, जि. सांगली. सध्या रा. कांदिवली मुंबई) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अशोक चंद्रकांत आडके, विजया अशोक आडके (दोघे रा. कांदिवली, मुंबई), मालन चंद्रकांत आडके (वय ७०, रा. जोंधळाखिंड, ता. खानापूर, जि. सांगली )व संध्याराणी बापू मंडले (वय ३५, रा. वडी-रायबाग, ता. कडेगाव, जि. सांगली) हे चौघे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सातारच्या जिल्हा रुग़्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.बुधवारी सकाळी ७ वाजता हा भीषण अपघात झाला. वॅगन आर गाडी (एमएच ०२ सीव्ही २११७) मुंबईहून येतगावकडे (जि. सांगली) निघाली होती. ही कार अशोक आडके यांच्या मालकीची आहे. सकाळी सातच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. कार प्रथम दुभाजकाला आणि नंतर पुढील पुलाच्या कठड्याला धडकली. हवालदार एम. जी. चव्हाण तपास करीत आहेत. (वार्ताहर)