Join us  

महिला पोलिसाला कारसह फरपटत नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 5:05 AM

ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हदरम्यान तपासणी सुरू असतानाच एका कारचालकाने तपासणी मशिनसह महिला पोलीस शिपायाला काही अंतरावर कारसह फरपटत नेल्याची धक्कादायक घटना मानखुर्दमध्ये घडली.

मुंबई : ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हदरम्यान तपासणी सुरू असतानाच एका कारचालकाने तपासणी मशिनसह महिला पोलीस शिपायाला काही अंतरावर कारसह फरपटत नेल्याची धक्कादायक घटना मानखुर्दमध्ये घडली. कारचालकाने दारूचे सेवन केले की नाही हे तपासण्यास महिला पोलिसाने मशिन पुढे केली, तोच कारचालकाने काच लावली. यामध्ये हात अडकल्याने त्या काही फुटांपर्यंत कारसह फरपटत गेल्या. पुढे त्याने काच खाली केल्यानंतर त्या खाली कोसळल्या. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी सरकारी कामात अडथळा, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हसह विविध कलमांतर्गत महेंद्र पवार या कारचालकावर गुन्हा नोंदविला आहे.मानखुर्द टी जंक्शन येथे ही घटना घडली. यामध्ये दुर्गा जाधव (३०) या महिला पोलीस जखमी झाल्या आहेत. जाधव या सोमवारी पहाटेच्या सुमारास वाहतूक पोलीस पथकासह ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या बंदोबस्तासाठी तैनात होत्या. त्यांनी महेंद्र पवार याच्या कारला (गाडी क्रमांक एमएच ०१ सीएच २४६२) थांबण्याचा इशारा केला. पवारने दारूचे सेवन केले की नाही हे पाहण्यासाठी मशिन पुढे केली. त्याने पहिल्यांदा श्वास घेतल्यानंतर त्याला पुन्हा श्वास घेण्यास सांगितले. तेव्हा अचानक पवारने कारच्या खिडकीची काच बंद केली. यामध्ये त्यांचा हातही अडकला. काही अंतरावर त्याही कारसह फरपटत गेल्या. पुढे त्यांनी हात बाहेर काढल्यानंतर पाठीमागून आलेल्या पोलिसांच्या गाडीतून त्यांनी कारचा पाठलाग केला.अखेर वाशी टोलनाका येथे त्याला अडविण्यात यश आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने मशिन तोडून ठेवल्याचे दिसून आले. पवारचा घाटकोपर परिसरात कॅटरर्सचा व्यवसाय आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी जबरी चोरी, सरकारी कामात अडथळा, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हसह विविध कलमांतर्गत त्याला अटक केली आहे. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. जखमी जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :अपघात