Join us
Daily Top 2Weekly Top 5

फुकट्या प्रवाशांकडून दंड वसुलीत महिलाच ठरली नंबर वन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:06 IST

विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यातही महिलाच आघाडीवर आहेत. मध्य रेल्वेच्या तेजस्विनी पथकातील मुख्य तिकीट तपासनीस शारदा विजय यांच्या कामगिरीवर नजर ...

विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यातही महिलाच आघाडीवर आहेत. मध्य रेल्वेच्या तेजस्विनी पथकातील मुख्य तिकीट तपासनीस शारदा विजय यांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास आपल्याला ते लक्षात येईल. त्यांनी गेल्या दोन महिन्यांत विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करीत मध्य रेल्वेला तब्बल तीन लाखांहून अधिक महसूल प्राप्त करून दिला. फुकट्या प्रवाशांकडून दंड वसूल करणाऱ्यांत त्यांचा पहिला नंबर लागतो. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे कोरोनाकाळात अनोळखी प्रवाशांकडून संसर्गाचा धोका असतानाही त्यांनी आपल्या कर्तव्यात खंड पडू दिला नाही.

रेल्वेस्थानकात दाखल झालेल्या किंवा डब्यामधील प्रत्येक प्रवाशाची तपासणी करणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. अशावेळी तिकीट तपासनीसाला आपल्या चाणाक्ष नजरेतून अचूक व्यक्ती हेरावा लागतो. काहीजण हुज्जत घालतात किंवा एखाद्या अधिकाऱ्याला अथवा नेत्याला फोन लावून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी वेळप्रसंगी अरेला कारे म्हणत दंड वसूल करावा लागतो, असे शारदा यांनी सांगितले.

शारदा यांची आपल्या कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, या वयातील त्यांची तत्परता आणि धडपड केवळ महिलांनीच नव्हे, तर पुरुषांनीही अंगिकारावी अशीच आहे.

.........................................