मनीषा म्हात्रे / मुंबईकार्यालयीन कामकाजादरम्यान महिला कर्मचारी नागरिकांना बाहेर थांबवून चक्क साड्या खरेदीत व्यस्त असल्याचा प्रकार मुलुंडच्या रेशनिंग कार्यालयात पहावयास मिळाला. या खरेदीमुळे वेटींग लिस्टवर असलेल्या नागरिकाने या महिलांचा प्रताप मोबाईलच्या कॅमेरात टिपला. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार दाखल करताच महिलांना समन्स बजाविण्यात येणार असल्याचे वरिष्ठांनी ‘लोकमत’ला सांगितले. या वृत्तामुळे मुलुंड परिसरात एकच खळबळ उडाली. मुलुंड रेशनिंग कार्यालयात १८ एप्रिल रोजी दुपारी साडे बारा ते एकच्या दरम्यान हा प्रकार घडला. कार्यालयीन कामकाज सुरु असताना साड्या घेउन एक व्यक्ती आत आली. एका महिला कर्मचाऱ्याच्या टेबलावरील कागदपत्रे सरकवून तेथेच त्याने साड्या ठेवल्या. हे पाहून महिला कर्मचारी हातातील काम सोडून त्याच्याभोवती गोळा झाल्या. त्यानंतर रेशनिंगसंबंधी विविध कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना चक्क ‘प्लीज वेट’.. सांगत बाहेर थांबण्याचा सल्ला या महिला कर्मचाऱ्यांनी दिल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी केल्या आहेत. याच दरम्यान मुलुंड कॉलनी येथील रहिवासी असलेला तरुण राजेंद्र पाटील येथे आला. रेशनिंग कार्डमधील पाने पूर्ण भरल्याने तो अतिरिक्त पानांसाठी आॅनलाईन अर्ज भरत होता. मात्र, साईटवर अर्ज भरण्यास अडचणी येत असल्याने त्याने तेथील महिला कर्मचाऱ्याकडे धाव घेतली. तेव्हा साडी खरेदीत व्यस्त असलेल्या महिला कर्मचाऱ्याने रेशनिंग दुकानदारांकडून अतिरिक्त पुरवणी घ्या, असा सल्ला दिला. त्याने त्यांचा हा प्रताप कॅमेरात कैद केला. काही दिवसाने धाडस करत याप्रकरणी मुलुंड रेशनिंग अधिकारी टी. के पवार यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्यांना मोबाईलमध्ये कैद केलेला साडी खरेदीचा प्रकारही दाखवल्याचे पाटीलने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कार्यालयीन वेळेत महिला साड्यांच्या खरेदीत व्यस्त
By admin | Updated: April 27, 2017 00:21 IST