Join us

महिलेचा न्यूड व्हिडीओ कॉल पडला महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंधेरीतील ५७ वर्षीय व्यक्तीला फेसबुक मैत्रिणीचा न्यूड व्हिडीओ कॉल उचलणे महागात पडले आहे. महिलेने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अंधेरीतील ५७ वर्षीय व्यक्तीला फेसबुक मैत्रिणीचा न्यूड व्हिडीओ कॉल उचलणे महागात पडले आहे. महिलेने संबंधित व्यक्तीला त्याचे अश्लील व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत, २७ हजार रुपये उकळले. पुढे आणखी केलेल्या पैशांची मागणी पूर्ण न केल्याने या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी शनिवारी महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवत अंधेरी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

तक्रारदार हे अंधेरीतील रहिवासी असून, खासगी कंपनीत नोकरीला आहेत. २३ जून रोजी त्यांना रिया वर्मा नावाच्या अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांनी तत्काळ रिक्वेस्ट स्वीकारली. पुढे काही दिवस महिलेसोबत संवाद झाला. अशात २६ जून रोजी सकाळी आंघोळ करत असताना महिलेचा व्हिडीओ कॉल आला. मुलीने फोन आणून त्यांच्याकडे दिला. त्यांनी कॉल घेताच एक विवस्त्र महिला त्यात दिसली. त्यांनी तत्काळ कॉल कट केला. पुढे दोन ते तीनवेळा त्या क्रमांकावरून फोन आला. मात्र, त्यांनी तो उचलला नाही.

त्यानंतर कॉल करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, संबंधित महिलेने ५० हजार रूपयांची मागणी केली. त्यामुळे बदनामीच्या भीतीने त्यांनी २१ हजार रुपये ऑनलाईन पाठवले. पुढे आणखी पैशांची मागणी करताच त्यांनी कॉल घेणे बंद केले. काही दिवसांनी त्यांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याचे त्यांच्या मित्रांकडून समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी शनिवारी अंधेरी पोलीस ठाण्यात याविषयीची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे.