Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर अत्याचार करून लुटणारा भोंदूबाबा गजाआड

By admin | Updated: March 16, 2015 03:53 IST

भविष्यात अधिक यश संपादन करण्याचा बहाणा करून महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला लुटणाऱ्या भोंदूबाबाला वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी अटक केली.

मुंबई : भविष्यात अधिक यश संपादन करण्याचा बहाणा करून महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला लुटणाऱ्या भोंदूबाबाला वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी अटक केली. शांतीलाल शहा (५६) असे या भामट्याचे नाव असून, तो बोरीवली येथे राहणारा आहे.सायनच्या प्रतीक्षानगर येथे राहणाऱ्या एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती शनिवारी वडाळा टीटी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला. ही महिला एका नामवंत कंपनीमध्ये कामाला आहे. काही दिवसांपूर्वी तिची या आरोपीसोबत ओळख झाली होती. या महिलेचा विश्वास या भोंदूबाबाने संपादन केला. भविष्यात अधिक यश मिळवण्यासाठी या भोंदूकडे महिलेने विचारणा केली. यावर मोठी पूजा करावी लागेल, असे सांगून त्याने तिला वर्सोवा परिसरातील एका लॉजवर नेले. या ठिकाणी अत्याचार केल्यानंतर त्याने अनेकदा जादूटोणा करून तुझ्या कुटुंबीयांना ठार करेन, अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. तसेच तिच्याकडून पूजेच्या नावावर २ लाख रुपये देखील उकळले. फसवणूक झाल्याचे समजताच महिलेने पैसे देण्यास नकार दिला. कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांना ही माहिती समजताच त्यांनी आरोपीला अटक केली. (प्रतिनिधी)