Join us

तोकडे कपडे घातले म्हणून महिलेला विमान प्रवास नाकारला

By admin | Updated: October 29, 2015 20:41 IST

इंडिगो या विमान वाहतूक कंपनीने एका महिला प्रवाशाला तोडके कपडे परिधान केल्यामुळे प्रवास करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २९ -  इंडिगो या विमान वाहतूक कंपनीने एका महिला प्रवाशाला तोडके कपडे परिधान केल्यामुळे  प्रवास करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. 
इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून दिल्लीला ही महिला प्रवास करणार होती, मात्र तिला तोडके कपडे परिधान केल्याचे कारण देत इंडिगोच्या कर्मचा-यांनी तिला अडविले आणि प्रवास करण्यास नकार दिला. संबंधित महिला ही इंडिगोची माजी कर्मचारी असून तिची बहिणही इंडिगोमध्येच कार्यरत आहे. 
या महिलेने परिधान केलेल्या कपड्यांत कोणत्याही प्रकारची अश्लिलता नव्हती. मात्र, तिने गुडघ्यापर्यंत असलेले कपडे परिधान केले होते तरीही तिला अडवण्यात आले. त्यानंतर तिला कपडे बदलून आल्यानंतर दुस-या विमानाने दिल्लीला पाठविण्यात आल्याचे विमानातील तिच्या सहप्रवाशांने सांगितले. 
दरम्यान, याप्रकरणी इंडिगोने खुलासा केला आहे. संबंधित महिला ही इंडिगोची माजी कर्मचारी असून तिची बहिण सध्या या कंपनीत कार्यरत आहे. त्यामुळे इंडिगोच्या नियमानुसार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आलेल्या सवलतीअंतर्गत विमान प्रवास करत असतील तर, त्यांना विमान प्रवासात इंडिगोने ठरविलेल्या ‘स्पेशल ड्रेस कोड’चे पालन करणे बंधनकारक आहे. त्यानुसार त्या महिलेला थांबविण्यात आल्याचे इंडिगोकडून सांगण्यात आले आहे.