Join us

म्हाडा लॉटरीतील विजेत्यांची फसवणूक; विकासकाने परस्पर विकल्या सदनिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 01:40 IST

कल्याण खोणी परिसरातील सरकारी भूखंडावर परवडणारी घरे बांधण्यासाठी गृहनिर्माण मंत्रालय, म्हाडा आणि तत्कालीन गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यात समझोता झाला.

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने २०१८ साली काढलेल्या सोडतीमध्ये विजेते ठरलेल्या अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील खोणी येथील सदनिका विकासक मे. पलावा यांच्याकडून भलत्यांनाच विकल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे म्हाडाच्या घराचे स्वप्न बघणाऱ्या ३० पेक्षा अधिक विजेत्यांना धक्का बसला आहे. म्हाडा व गृहनिर्माण मंत्रालय यावर काय निर्णय घेणार याकडे विजेत्यांचे लक्ष लागले आहे.

कल्याण खोणी परिसरातील सरकारी भूखंडावर परवडणारी घरे बांधण्यासाठी गृहनिर्माण मंत्रालय, म्हाडा आणि तत्कालीन गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यात समझोता झाला. यानुसार २० टक्के घरे म्हाडाला देण्याचे विकासक पलावा डेव्हलपर्सने मान्यही केले. मात्र म्हाडाने आपल्या हिश्याला आलेली घरे ६ महिन्यात ताब्यात घ्यावीत, अशी अट घातली. याच अटीचा फायदा म्हाडाला होण्याऐवजी विकासकालाच अधिक होत असल्याचे आजवरच्या अनुभवातून पुढे आले आहे.

सोडतीतील विजेत्याच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर ती फाईल लवकरात लवकर विकासकाकडे पाठवून घर ताब्यात घ्यायचे असते. मात्र म्हाडातील अधिकारी पलावा डेव्हलपर्सला विजेत्याची फाईल वेळेत न पाठवता ती तशीच पडून राहिल्यामुळे अनेक विजेत्यांना आपल्या हक्काच्या घरावर पाणी सोडावे लागले आहे. याचा फायदा घेऊन विकासकाने अनेक विजेत्यांची घरे परस्पर विक्रीस काढून कोट्यावधींचा फायदा कमावला आहे. यामुळे म्हाडाचे देखील नुकसान झाले आहे. यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. हक्काच्या घरांपासून वंचित राहिलेल्या संबंधित विजेत्यांनी मे. पलावा डेव्हलपर्स आणि म्हाडाविरोधात डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

म्हाडा लॉटरीतील विजेत्यांची घरे विकासकाकडून परस्पर विकणे ही मोठी गंभीर बाब असून सोडतीतील विजेत्यांनी तशी तक्रार केल्यास विकासका विरोधात कडक कारवाई केली जाईल, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. तसेच याापुढे म्हाडाला मिळणारा स्टॉक हा वेगळा न घेता तो विकासकाने विक्रीस बांधलेल्या इमारतीतील प्रत्येक मजल्यावर उपलब्ध सदनिकांमधूनच घेतला जाईल. त्यामुळे म्हाडालाही चांगली घरे उपलब्ध होतील असेही ते यावेळी म्हणाले.