Join us
Daily Top 2Weekly Top 5

चित्रीकरणासाठी एक खिडकी योजना

By admin | Updated: September 4, 2015 00:49 IST

सिनेमा आणि मालिकांना चित्रीकरणासाठी देण्यात येणाऱ्या परवानग्यांसाठी एक खिडकी योजना राबविणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे

मुंबई : सिनेमा आणि मालिकांना चित्रीकरणासाठी देण्यात येणाऱ्या परवानग्यांसाठी एक खिडकी योजना राबविणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. सिनेमा आणि मालिकांना चित्रीकरणापूर्वी कमीतकमी ५ आणि जास्तीतजास्त ७ दिवसांत सर्व परवानग्या दिल्या जाव्यात, यासाठी योजना बनविण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. फिल्म इंडस्ट्री फेडरेशनच्या विविध मागण्यांसंदर्भात आज सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या दालनात बैठक झाली. या वेळी तावडे म्हणाले की, सिनेमा आणि मालिका यांच्या चित्रीकरणासाठी विविध विभागांच्या जवळपास ३० ते ३२ परवानग्यांची आवश्यकता आहे. यासाठी निर्मात्यांना विविध विभागांकडे पाठपुरावा करावा लागतो. त्यामुळे वेळ खर्ची पडतो आणि निर्मात्यांना त्रासही होतो. त्यामुळेच निर्मात्यांना चित्रीकरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या एक खिडकी योजनेंतर्गत सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सदर एक खिडकी ही गोरेगाव येथील चित्रनगरी येथे सुरू करण्यात येईल आणि सर्व आवश्यक परवानग्या देण्याचे नियोजन केले जाईल, असेही तावडे यांनी या बैठकीत सांगितले.करमणूक क्षेत्रामार्फत शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. त्यामुळे या क्षेत्राला उद्योग क्षेत्राचा दर्जा देणे, तसेच या क्षेत्रातील कलाकारांना पेन्शन, वैद्यकीय सुविधा देणे, या क्षेत्रातील लोकांना संरक्षण देणे याबाबतही राज्य शासन सकारात्मक आहे, असेही तावडे यांनी सांगितले. मालिकांची व्याप्ती लक्षात घेता या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी स्वतंत्र कायदा करता येईल का याबाबतही विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.