Join us  

‘एमएमआरसीएल’वर कारवाई करणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 3:30 AM

मेट्रो-३ ध्वनिप्रदूषण प्रकरण : उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

मुंबई : कफ परेड, चर्चगेट व माहीम या ठिकाणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल), ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केले का, केले असल्यास त्यांच्यावर कारवाई करणार का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे बुधवारी केली.राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झालेले नाही. मात्र, याचिकाकर्त्या व आवाज फाउंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली यांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा अधिक होती.आवाजाची पातळी मोजण्यासाठी राज्य सरकार स्टँडर्ड आॅपरेटिंग सीस्टिम (एसओएस) वापरते. त्यानुसार, सरासरी आवाजाची पातळी मोजली जाते आणि त्या पद्धतीनुसार कफ परेड व माहिम येथे मेट्रोच्या कामामुळे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झालेले नाही, अशी माहिती सरकारी वकील मनिष पाबळे यांनी न्या.अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाला दिली.आवाजाच्या पातळीच्या मर्यादेची नोंद नसल्याने, राज्य सरकार संबंधितांवर गुन्हे नोंदवू शकत नाही, असेही पावळे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने ही बाब प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. ‘ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केले की नाही? उल्लंघन केले असेल, तर कारवाई करणार की नाही, हे आम्हाला सांगा. एखाद्या जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करावे,’ असे म्हणत न्यायालयाने ४ मेपर्यंत या याचिकेवरील सुनावणी तहकूब केली.दरम्यान, मेट्रो-३च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी केलेले टिष्ट्वट याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यांनी हे टिष्ट्वट न्यायालयाला उद्देशून केल्याचे याचिकाकर्त्याच्या वकिलांचे म्हणणे आहे. एका उच्चपदस्थ अधिकाºयाची ही वृत्ती असेल, तर त्याच्या कनिष्ठांकडून चांगल्या कामाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटले. मात्र, एमएमआरसीएलच्या वकिलांनी भिडे यांनी हे टिष्ट्वट न्यायालयाला उद्देशून केले नसून, याचिकाकर्त्यांना व मेट्रोच्या कामादरम्यान होणाºया आवाजाची तक्रार करणाºयांविरुद्ध केल्याचे न्यायालयाला सांगितले, परंतु न्यायालयाने त्यांना खाली बसण्यास सांगितले. ‘तुम्ही (एमएमआरसीएल) या याचिकेत प्रतिवादी नाही. त्यामुळे तुम्ही काहीही बोलू नका. यापूर्वी अशा अनेक बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आम्ही याकडेही दुर्लक्ष करत आहोत,’ असे न्या. ओक यांनी म्हटले....मग आयपीएलचा गोंगाट कसा चालतो?मेट्रोच्या कामांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण अनेकांना सलते. मात्र, आयपीएलमुळे होणारा गोंगाट त्यांना कसा चालतो, असा प्रश्न मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी टिष्ट्वटरवरून उपस्थित केला आहे. ‘आयपीएलचे सामने होतात, तेव्हा स्टेडियममध्ये खूप ध्वनिप्रदूषण होते. आवाजाच्या सगळ्या मर्यादाही या वेळी पार केल्या जातात. मग फक्त ठरावीक गोष्टींविरोधातच का टीका केली जाते, इकडे कुणी ऐकतेय का, क्रिकेटचा विषय आला की, नेहमी विरोध करणारे सायलेन्स झोनमध्ये गेलेत!’ असे टिष्ट्वट अश्विनी भिडे यांनी केले आहे.

टॅग्स :मेट्रो