मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर काही पदाधिकारी शिंदे सेनेत गेले तर काही पदाधिकारी उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ राहिले. यामध्ये युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत युवासेनेत काम काम करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांचा देखील मोठा सहभाग आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उद्धव सेनेला समाधानकारक यश मिळाले. लोकसभा व विधानसभा निवडणूकीत अनेक नवीन चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आली होती.आता येणाऱ्या काळात मुंबई-पुणे-नाशिक सह अनेक ठिकाणी महानगरपालिका उद्धव सेना स्वबळावर लढण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी काल अंधेरीत पक्षाच्या महामेळाव्यात दिले होते.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या तरुण पिढीला निवडणुकीत उतरवण्याची चाचपणी उद्धव सेनेतर्फे करण्यात येत असून जुन्या अनुभवी शिवसैनिकांच्या साथीने नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यामध्ये कुलाबा विधानसभा -प्रथमेश सकपाळ, गोरेगाव विधानसभा -अंकित प्रभू, शिवडी विधानसभा- मयूर कांबळे, पवन जाधव, दादर विधानसभा साईनाथ दुर्गे, दिंडोशी विधानसभा - समृद्ध शिर्के, माहिम विधानसभा- रणजित कदम, चांदीवली विधानसभा -बालाजी सांगळे, मुलुंड विधानसभा - राजोल पाटील या युवासेना पदाधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहे.पंरतू अंतिम निर्णय हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील अशी माहिती सूत्रांनी देखील दिली.
शिवसेनेत पडलेल्या फुटीला आताच्या काळातील युवा वर्ग नवसंजीवनी मिळवून देईल अशी आशा काही जेष्ठ शिवसैनिकांनी लोकमतकडे व्यक्त केली.