Join us

सर्वांसाठी रेल्वे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:06 IST

प्रवाशांची गर्दी रोखण्याचे आव्हानलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकलसेवा मर्यादित घटकांसाठी ...

प्रवाशांची गर्दी रोखण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकलसेवा मर्यादित घटकांसाठी सुरू आहे. त्यामध्ये एकेक घटकाची वाढ करण्यात येत आहे. दरम्यान, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्वांसाठी रेल्वे सुरू करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, गर्दी रोखण्याचे सरकारसमोर आव्हान असणार आहे.

रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नियमित रेल्वेफेऱ्यांच्या तुलनेत आता उपनगरीय रेल्वेच्या राेज ९० टक्के फेऱ्या होत आहेत. १० टक्के फेऱ्या वाढविण्यास वेळ लागणार नाही. रेल्वेची पूर्ण तयारी आहे. सरकारच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरून लोकल सुरू होतील. मात्र, प्रश्न गर्दीचा आहे. सर्वांसाठी रेल्वे सुरू झाल्यास गर्दी मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याला आवर घालणे सोपे नाही. फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून संचारबंदी करण्यात आली आहे, मात्र सर्वांसाठी रेल्वे सुरू केल्यास गर्दीतून कोरोना संसर्गाचा अधिक प्रसार होऊ शकतो, त्यामुळे त्याचाही विचार व्हावा.

*मुख्यमंत्र्यांची संबंधितांसाेबत चर्चा सुरू

नवीन वर्षातील पहिल्या आठ दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच मनात हा विचार आहे. याबाबत ते अनेक संबंधितांसाेबत चर्चाही करत आहेत, असे राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले होते. तसेच सर्वांसाठी लोकल सुरू करण्यासाठी आम्ही आधीही रेल्वेकडे प्रस्ताव दिला होता. आम्हीही परवानगी मागितली, तेव्हा रेल्वेने प्रस्तावात अनेक त्रुटी दाखवून ती परवानगी नाकारली असे त्यांनी सांगितले हाेते.