Join us

पहिली ते नववी, अकरावीच्या वर्गातील शिक्षक, विद्यार्थ्यांना सुटी मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:07 IST

परीक्षा, नियोजनासंदर्भातील सूचना नसल्याने शाळा संभ्रमातलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शालेय शिक्षण विभागाकडून पहिली ते नववी आणि अकरावीच्या ...

परीक्षा, नियोजनासंदर्भातील सूचना नसल्याने शाळा संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शालेय शिक्षण विभागाकडून पहिली ते नववी आणि अकरावीच्या वर्गांसंदर्भात अद्यापही मूल्यमापन योजनेविषयी निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे शाळा संभ्रमात आहेत. कोरोनामुळे मागील वर्षभरापासून मुंबई, पुणे आदी शहरांसह राज्यातील ग्रामीण भागांतील शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजनही शाळांना देण्यात आले नसल्याने याविषयी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसह मुख्याध्यापक संघटनांनी परीक्षांच्या नियोजनासोबतच मूल्यमापन पद्धतीवरही तातडीने निर्णय जाहीर करावा अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.

मुंबईसह राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. अशा वेळी पहिली ते नववीपर्यंतच्या सर्वच परीक्षा कशा आयोजित करायच्या, असा प्रश्न शाळांकडून उपस्थित हाेत आहे. अनेक शाळांनी वार्षिक परीक्षेसाठी शिक्षकांना प्रश्नपत्रिका काढण्यास सांगितले आहे, तर अनेकांनी वार्षिक परीक्षांचे नियोजन पालकांना पाठविले असून, या कोणामध्येही एकसूत्रता नाही. काही ठिकाणी ऑनलाइन शिक्षणावर आधारित मूल्यमापन असेलच असे नाही अशी पालकांची धारणा असल्याची माहिती राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली. मार्च २०२० पासून आतापर्यंत हे विद्यार्थी, शिक्षक सतत ऑनलाइन शिक्षणात असून, आता तरी त्यांना त्यापासून सुटी मिळणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दरवर्षी १० मार्चपर्यंत पहिली ते नववीपर्यंच्या इयत्तांचे पाठ्यक्रम पूर्ण होऊन त्यांचे मूल्यमापनही सुरू होते. यंदा शिक्षण विभागाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालक चिंतेत आहेत. आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात उत्तीर्ण करणे शक्य होईल. नववीच्या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गात पाठवणे चुकीचे ठरेल, यासंदर्भात विभागाने तातडीने खुलासा करावा. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी शैक्षणिक सत्राची समाप्ती करून विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करावी, अशी मागणी शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी केली.

...............................