Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट वाहतूक योजना फसणार?

By admin | Updated: December 13, 2015 00:13 IST

जुने ठाणे म्हणून ओळख असलेल्या ठाणे स्टेशनसह ७५४ एकर परिसराचा पुनर्विकास करण्याचा मानस ठाणे महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

ठाणे : जुने ठाणे म्हणून ओळख असलेल्या ठाणे स्टेशनसह ७५४ एकर परिसराचा पुनर्विकास करण्याचा मानस ठाणे महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. पण ठाणे स्टेशन परिसरातील सध्याची गर्दी-वाहनांची कोंडी आणि आधीच चुकलेल्या सॅटीसची अवस्था पाहता स्मार्ट सिटीचे नियोजन प्रत्यक्षात येणार की फसणार, असा प्रश्न उभा ठाकला आहे. या भागातील रस्ते वाढू शकणार नाहीत, पुनर्विकासही दूरच आहे. या मूलभूत अडचणींचा डोंगर पाहता स्टेशन परिसरापासूनच सुरू होणारा स्मार्ट सिटीचा प्रवास प्रत्यक्षात येणार की ते कंत्राटे मिळवण्यापुरते स्वप्नरंजन ठरणार, हाच प्रश्न ठाणेकरांना पडला आहे. ठाणे स्मार्ट सिटी सर्वेक्षणांतर्गत पहिल्या टप्प्यात चार दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या व्यापक सर्वेक्षण मोहीमेनंतर आणि आतापर्यंत विविध माध्यमातून ठाणेकरांनी नोंदविलेल्या मतानुसार, ठाणे स्टेशन या गर्दीच्या परिसराचा पुनर्विकास करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यासाठी पालिकेला ५५०० कोटींचा जम्बो आराखडाही तयार केला आहे. स्टेशन परिसरात पूर्वेकडील सॅटीस, गावदेवी मैदानात पार्कींग प्लाझा, मनोरुग्णलायच्या जागेवर नवीन स्टेशन, वॉटर फ्रन्ट डेव्हलप्मेंट प्रकल्प आदी काही महत्वांच्या बाबींचा यात समावेश आहे.सध्या ठाणे स्टेशन परिसरात रोज सुमारे आठ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्रीसुध्दा येथे गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. स्टेशन परिसराचा विकास करण्याचा दावा जरी पालिका करीत असली तरी आधीच पालिकेचा येथील महत्त्वाकांक्षी सॅटीसचा प्रोजेक्ट फसला आहे. आज सॅटीसवर एक बस जरी बंद पडली तरी, जांभळीनाक्यापर्यंत दोन्ही बाजुने वाहतुक कोंडी होते. खालच्या बाजुला रिक्षा आणि टॅक्सी स्टँड असून, फेरीवाल्यांचा गराडा आजही या भागाला आहे. त्यातही येथे टोलेजंग इमारतींचा लवाजमा आहे, एसटी स्टँडही बाजुलाच आहे. परंतु आजही हा संपूर्ण परिसर वाहतुक कोंडी, वाहनांच्या आवाजांनी आणि प्रदुषणामुळे गजबजलेला आहे. परंतु या भागात नव्याने विकास करण्यासाठी अथवा काही बदल करण्यासाठी पालिकेला येथे फारसा वावच नाही. नव्याने एखाद्या वाहिनी टाकायच्या झाल्या तरी त्याचा परिणाम वाहतुक कोंडीत आणखी भर घालणारा ठरणार आहे. तसेच ३० वर्षे जुन्या इमारतींचा लवाजमा हा स्टेशन परिसरापासून, दूरच्या अंतरावर आहे. त्यामुळे त्यांचा पुनर्विकास होऊ शकतो. परंतु स्टेशन परिसरात पालिकेला तसा फारसा वाव नाही. विशेष म्हणजे येथील रस्ते वाढतील अशातलादेखील भाग नाही. त्यामुळे येथील कोंडी फुटणार का? असा सवाल आतापासून उपस्थित केला जात आहे. पार्किंग प्लाझा उभारण्याचा दावा जरी केला जात असला तरी येथील कोंडी फुटेल, असा विश्वास तज्ज्ञांना वाटत नाही. मनोरुग्णालयाच्या जागेवर नवीन रेल्वे स्टेशन प्रस्तावित करण्यात आले आहे. परंतु गेली कित्येक वर्षे या स्टेशनचे कागदी घोडे पालिका आणि पुढारी नाचवत आहेत. मात्र त्यांना अडथळ्यांची शर्यत पार करता आलेली नाही.स्मार्ट शहर कसे हवे?ठाणे असो की कल्याण-डोंबिवली... ही शहरे स्मार्ट व्हावीत, यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका त्यासाठी वेगवेगळ््या मार्गाने प्रयत्न करताहेत. अनेक योजना आखल्या जात आहेत. मोठ-मोठ्या प्रकल्पांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. ते स्मार्ट व्हायला हवे म्हणजे तेथे कोणत्या सुविधा हव्यात?सध्याच्या व्यवस्थेने काय केले, म्हणजे आपली ही शहरे स्मार्ट होतील?शहर स्मार्ट झाल्याचा नागरिकांना खरोखरच उपयोग होईल का?या विषयावर तुमची मते, तुमची भूमिका, तुमचे म्हणणे आम्हाला पुढील पत्त्यावर पाठवा- लोकमत ठाणे कार्यालय, सरस्वती भुवन, दुसरा मजला, मल्हार टॉकीजसमोर, गोखले रोड, संत नामदेव चौक, ठाणे (प.) फॅक्स - (०२२) २५४४१९०७. मेल आयडी : lokmat.thanekar@gmail.com  वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेंटचेही दिवास्वप्न मागील तीन वर्षापासून ठाणेकरांना दाखविले जात आहे. परंतु त्याचेसुध्दा पुढचे पाऊल पडलेले नाही. येथील कोंडी फोडण्यासाठी पूर्वेच्या बाजूला सॅटीसची संकल्पना पुढे आली आहे.परंतू पश्चिमेच्या सॅटीसचे वाटोळे झाल्यानंतर पूर्वेकडील सॅटीस यात कितपत तग धरणार याबाबतही शंका उपस्थित होत आहेत.