Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वर्षात मुंबईतील शाळांची घंटा वाजणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:08 IST

संभ्रम कायम : शाळांची चाचपणी सुरू, लवकरच निर्णयाची शक्यतालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काेराेना संसर्ग नियंत्रणात आल्याने नवीन ...

संभ्रम कायम : शाळांची चाचपणी सुरू, लवकरच निर्णयाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : काेराेना संसर्ग नियंत्रणात आल्याने नवीन वर्षात जानेवारीपासून मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यास परवानगी मिळणार का, याबाबत अद्याप सूचना न मिळाल्याने विद्यार्थी, पालक व संस्थाचालक संभ्रमात आहेत. शाळांची चाचपणी सुरू असून पालिका प्रशासनाकडून लवकरच याबाबतीतील निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पालिका शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यातील ९वी ते १२वीचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू झाले असले तरी पालिका प्रशासनाच्या निर्देशांप्रमाणे ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनावर सोपविला आहे. मागील काही दिवसांपासून कमी होणारी रुग्णसंख्या आणि नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे यासंदर्भातील सकारात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये शाळा सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. ठाणे जिल्हा परिषदेकडून सर्व शाळांच्या मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राचार्यांना शाळा व शैक्षणिक संस्थांना पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, शाळा सुरू करण्यासंबंधीचा प्रस्ताव पालिका शिक्षण विभागाने आयुक्तांकडे सादर केला असून यावर या आठवड्यात निर्णय होऊ शकतो, असे पालिका शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

* पुन्हा शिक्षक चाचण्या, शाळांची स्वच्छता

शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा एकदा सर्व शिक्षकांच्या कोविड १९च्या चाचण्या तसेच शाळांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया, स्वच्छतेची काळजी ही सारी प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यामुळे यासाठी प्रशासनाने शाळा व मुख्याध्यापकांना योग्य मुदत द्यावी, अशी मुख्याध्यापकांची मागणी आहे.

..................................