Join us

कोळी महिलांवर होणारा अन्याय सहन करणार नाही, गोपाळ शेट्टींचा वाहतूक पोलिसांना इशारा

By मनोहर कुंभेजकर | Updated: September 15, 2022 13:29 IST

Gopal Shetty : या संदर्भात गोपाळ शेट्टी यांनी पोलीस उपायुक्त नितीन ठाकूर आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कानोलगावकर यांना फोन करून त्यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुंबई: एकीकडे कष्टकरी कोळी महिला मुंबईकरांना पौष्टिक अन्न पुरवत असताना मालाड पश्चिम मढ कोळीवाडा ते कुलाबा ससून डॉक येथे मासळीच्या टेम्पोतून जाताना मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी त्यांना ४०००० रुपये दंड ठोठाठला. या संदर्भात मढ कोळीवाड्यातील कोळी महिलांनी आज सकाळी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या बोरिवली पश्चिम लोकमान्य नगर येथील कार्यालयात भेट घेतली आणि आपली कैफियत मांडली.

या संदर्भात गोपाळ शेट्टी यांनी पोलीस उपायुक्त नितीन ठाकूर आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कानोलगावकर यांना फोन करून त्यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, सकाळी पहाटे लवकर उठून कोळी महिला आपला व्यवसाय करतात. एक जून ते ३१ जुलै याकाळात मासेमारी बंद होती. आता कुठे गणपतीनंतर मासेमारी सुरू झाली आहे. त्यांच्या एका गाडीला ४०००० रुपये दंड करणे हे अन्यायकारक असून जर कोळी महिलांची अशीच अडवणूक वाहतूक पोलिसांकडून होत असेल तर आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा गोपाळ शेट्टी यांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या व्हिडिओद्वारे दिला.

याप्रकरणी पोलीस उपायुक्तांनी देखील आश्चर्य व्यक्त करून आपण जातीने लक्ष घालू असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती गोपाळ शेट्टी यांनी लोकमतला दिली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरित क्रांती योजनेचा लाभ मच्छिमारांना मिळण्यासाठी केंद्रात कृषी खात्यातून मत्स्यव्यवसाय खाते वेगळे केले.आजच्या आज पोलिसांनी क्लेरिफिकेशन नोट काढली नाही आणि पोलिस यंत्रणेकडून जर असाच अन्याय कोळी माहिलांवर होत असेल तर खासदार म्हणून आपण तो कदापी सहन करणार नाही असा इशारा सुद्धा गोपाळ शेट्टी यांनी दिला.

टॅग्स :गोपाळ शेट्टीमुंबई