Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंडे यांची आमदारकी रद्द होणार की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:07 IST

निवडणूक आयोगाच्या कोर्टात बॉलमुंडे यांची आमदारकी रद्द होणार की नाही?चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टातलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई ...

निवडणूक आयोगाच्या कोर्टात बॉल

मुंडे यांची आमदारकी रद्द होणार की नाही?

चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला. मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे या आरोपाचे खंडन केले. बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांची बहीण करुणा यांच्याबरोबर परस्पर संमतीने संबंध होते आणि त्यातून दोन मुले जन्मल्याचे मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले. त्यांच्या या कबुलीमुळे मुंडे यांची आमदारकी धोक्यात येणार का, असा प्रश्न आहे.

करुणा यांच्यापासून झालेली दोन मुले आणि कायदेशीर पत्नीपासून झालेल्या तीन मुली, अशी पाच मुले असलेले मुंडे कायदेशीररीत्या अडचणीत येऊ शकतात. त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कायदेशीर पत्नीपासून झालेल्या तीन मुलींचा उल्लेख केला आहे. मात्र, करुणा यांच्यापासून झालेल्या दोन मुलांचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे.

मुंडे यांची दोन अपत्ये २००१ नंतर जन्माला आली असतील तर मुंडे यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे. कारण कायदा याबाबत स्पष्ट आहे. २००१ नंतर तिसरे अपत्य जन्माला आले असेल तर संबंधित व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते. तसेच प्रतिज्ञापत्रावर खोटी माहिती देणे गुन्हा आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोग काय करेल, याकडे लक्ष आहे, असे ॲड. गणेश सोवनी यांनी सांगितले.

मुंडे यांची आमदारकी आपोआप रद्द होणार नाही. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी लागेल. त्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग मुंडे यांना नोटीस बजावेल, त्यांचे म्हणणे जाणून घेईल, मग चौकशी करेल. ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल, अशी माहिती सचिंद्र शेट्ये यांनी दिली.

आता मुंडे यांच्याविरोधात निवडणूक याचिका दाखल करू शकत नाही. कारण उमेदवार निवडून आल्यानंतर ३० दिवसांत त्याच्या निवडीला आव्हान द्यावे लागते, असेही शेट्ये यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भाजपचे किरीट सोमय्या यांनी मुंडे यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय कार्यवाही करणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

....................................................