Join us  

मुंबई यंदाही तुंबणार? दादर, हिंदमाता पाण्याखाली जाण्याची प्रशासनाची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 5:59 AM

मुंबई - मान्सून यंदा लवकर दाखल होणार असतानाच मुंबईत नालेसफाईची कामे समाधानकारक झालेली नाहीत. त्यामुळे मुंबई यंदाही पाण्याखाली जाणार, असा आरोप विरोधकांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला. या आरोपाचे खंडन न करता एक प्रकारे पालिका प्रशासनाने हे वास्तव मान्य केल्याचे दिसून आले. एवढेच नव्हेतर, दादर, हिंदमाता या परिसरात यंदाही पाणी तुंबणार असल्याने थोडा त्रास सहन करण्याचा सल्ला देत पालिका अधिकाऱ्याने मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळले. कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही मुंबईत पाणी तुंबणार, असे अधिकारी स्वत:च कबूल करीत असल्याने विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी रंगली.गोरेगाव येथील वालभट नदीच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी सादर केला होता. यावर चर्चा करताना नगरसेवकांनी नालेसफाईच्या कामांबाबत शंका व्यक्त करीत प्रशासन आणि सत्ताधाºयांवर निशाणा साधला. नाल्यातून काढलेला गाळ मुंबईबाहेर टाकण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात तो कांजूर आणि मुलुंड येथील क्षेपणभूमीत टाकण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. मुंबईत पाणी तुंबणार नाही, याची प्रशासनाच्या वतीने सत्ताधारी शिवसेनेने हमी देण्याचे आव्हानच त्यांनी दिले.मान्सूनला लवकरच सुरुवात होणार असताना मुंबईमधील नाल्यांची सफाई झालेली नाही. अनेक ठिकाणच्या मोठ्या नाल्यांमध्ये कचरा साचला आहे. नालेसफाईची कामे अखेरच्या टप्प्यात आहेत. मात्र, आजही अनेक नाल्यांमध्ये कचरा साचला असल्याचे राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी छायाचित्रे सादर करीत स्थायी समितीच्या निदर्शनास आणून दिले. तर समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनीदेखील ‘ई’ वॉर्डमध्ये नालेसफाई दोन दिवसांपूर्वी सुरू झाल्याचाआरोप केला.मात्र, एकीकडे विरोधक आक्रमक होत असताना अनेक उपाययोजना करूनही हिंदमाता यंदा तुंबणार, असे प्रशासनानेच मान्य केल्याने सत्ताधारी शिवसेना तोंडघशी पडली.अधिकाºयाचा अजब सल्ला-मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यानंतर पूर्वी हिंदमाता परिसरात कंबरभर पाणी साचत होते. गेल्या वर्षी ब्रिटानिया उदंचन केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर या परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. गेल्या वर्षभरात पालिकेने विविध उपाययोजना केल्या.- पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये मोठमोठ्या झाडांच्या मुळांमुळे अडथळा निर्माण झाला आहे. त्यावर उपाययोजना करण्यात येत आहे. तरीही पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे थोडा त्रास सहन करावा लागेल, असा अजब सल्लाच पर्जन्य जलवाहिन्या खात्याचे प्रमुख अभियंता विद्याधर खंडकर यांनी दिला.नाल्यातील गाळ जातो कुठे?नाल्यातील गाळ मुंबईतील क्षेपणभूमीवर टाकण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. मात्र, या आरोपांचे खंडन शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी केले. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासोबत आपण नालेसफाईच्या कामांची पाहणी केली, त्या वेळी नाल्यातील गाळ भिवंडी येथे टाकण्यात येत असल्याच्या पावत्या दाखविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईपाऊसमुंबई महानगरपालिका