मुंबई : रिक्षा-टॅक्सीचालकांना दोन रुपयांनी भाडेवाढ मिळाली आणि चालक तसेच युनियनमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागेल. या भाडेवाढीमुळे तरी भाडे नाकारण्याचे प्रकार चालकांकडून कमी होतील, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे. गेल्या साडेचार वर्षांत तब्बल ६६ हजार ७७६ केससे भाडे नाकारण्याच्या घडल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले, तर ज्यादा भाडे आकारणीच्या एक हजार केसेस घडल्या आहेत. रिक्षाचे भाडे १५ रुपयांवरून १७ रुपये तर टॅक्सीचे भाडे १९ रुपयांवरून २१ रुपये होणार आहे. गेल्या दोन वर्षांत हकीम कमिटीनुसार भाडेवाढ झाली नव्हती. न्यायालयात केस प्रलंबित असल्यानेच त्यास उशीर झाला होता. मात्र आता नवीन भाडे लागू होणार असल्याने चालक आणि वाहकांकडून सौजन्याची वागणूक मिळेल, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. जवळचे भाडे नाकारत लांब मार्गाचे भाडे घेणे, ज्यादा भाडे आकारणी करण्याचे प्रकार गेल्या साडेचार वर्षांत टॅक्सीचालक आणि वाहकांकडून मोठ्या प्रमाणात झाले आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भाडे नाकारण्याच्या सर्वाधिक केसेसची नोंद वाहतूक पोलिसांकडे झाली आहे. २0१0 मध्ये २१ हजार ६५५ केसेस भाडे नाकारण्याच्या झाल्या असून, २0११ मध्ये २२ हजार २१ केसेस दाखल झाल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. २0१४ मध्ये ३१ जुलैपर्यंत ५ हजार २९१ केसेस दाखल आहेत. शहर भागात चर्चगेट, मुंबई सेंट्रल, लोअर परेल, महालक्ष्मी, एल्फिन्स्टन, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी ते बोरीवली, सीएसटी, भायखळा, दादर, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी या भागातून सर्वाधिक केसेसची नोंद होत आहे. ज्यादा भाडे नाकारण्याचे प्रकार चालकांकडून होत असून, साडेचार वर्षांत एक हजार ४८ केसेस दाखल झाल्या आहेत. २0१0 आणि २0१३ मध्ये अनुक्रमे ३२८ आणि ३२३ अशा केसेस दाखल आहेत. (प्रतिनिधी)
मुजोरी थांबणार का?
By admin | Updated: August 14, 2014 01:38 IST