Join us  

फाइव्ह स्टार हॉटेलमधून बाथटब होणार गायब ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 4:06 PM

आयुष्यात एकदा तरी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामाची संधी मिळावी अशी अनेकांची मनापासून इच्छा असते. फाइव्ह स्टार हॉटेलमधल्या आलिशान रुम्स, अंतर्गत सजावटीच्या बरोबरीने आकर्षण असते ते बाथटबचे.

ठळक मुद्देताज, ओबेरॉय आणि आयटीसी हे हॉटेलिंग उद्योगातील बडे समूह बाथरुमची मांडणी, रचना, सजावट कशी असावी याचा फेरआढावा घेत आहेत. बाथटब पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय हॉटेलचा ब्राण्ड आणि कुठल्या प्रकारचे पाहुणे येतात त्यावर अवलंबून आहे.

मुंबई - आयुष्यात एकदा तरी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामाची संधी मिळावी अशी अनेकांची मनापासून इच्छा असते. फाइव्ह स्टार हॉटेलमधल्या आलिशान रुम्स, अंतर्गत सजावटीच्या बरोबरीने आकर्षण असते ते बाथटबचे. चित्रपटात, मालिकांमधल्या कलाकारांचे बाथटबमधले डुंबणे पाहिल्यानंतर आपल्या मनातही बाथटबमध्ये आंघोळ करण्याची इच्छा निर्माण होते. फाइव्ह स्टार हॉटेलमधले सर्वांच्याच आकर्षणाचा विषय असलेले हे बाथटबस लवकरच इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

कधीकाळी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये  बाथटब बंधनकारक होते. पण आता हे बाथटबस काढून टाकण्याचा विचार सुरु झाला आहे. ताज, ओबेरॉय आणि आयटीसी हे हॉटेलिंग उद्योगातील बडे समूह बाथरुमची मांडणी, रचना, सजावट कशी असावी याचा फेरआढावा घेत आहेत. बडया फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरणाऱ्या पाहुण्यांचा कल झटपट आंघोळ उरकण्याकडे असतो तसेच नियमात झालेल्या बदलांमुळे आता फाइव्ह स्टार हॉटेल्सना बाथटब बंधनकारक नाही. 

बाथटब पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय हॉटेलचा ब्राण्ड आणि कुठल्या प्रकारचे पाहुणे येतात त्यावर अवलंबून आहे. मॅरियट, हिलटॉन या बडया हॉटेल समूहांनी त्यांच्या काही रुम्समधून बाथटब काढून टाकलेत. ऑबेराय समूहाने याबद्दल माहिती देताना सांगितले कि, त्यांच्या शहरातील हॉटेल्समध्ये बाथटबचा वापर 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. भविष्यातील मालमत्तांसाठी बाथटबची किती आवश्यकता आहे याचा आम्ही आढावा घेत आहोत. 

सध्या ट्रायडेंट आणि ओबेरॉय हॉटेलमधल्या सगळया खोल्यांमध्ये बाथटबस आहेत असे ओबेरॉयच्या हॉटेल समूहाच्या महिला प्रवक्त्याने सांगितले.बदललेल्या नियमांमुळे हॉटेलच्या बाथरुम्सच्या अंतर्गत रचनेत आता बदल करता येऊ शकतो. बाथटबमध्ये आंघोळ करताना सरासरी 370 लिटर पाणी लागते तेच शॉवरखाली फक्त 70 लिटर पाणी लागते. त्यामुळे बाथटब काढले तर एकप्रकारे पाण्याची बचतच होईल. 

टॅग्स :हॉटेल