Join us

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून अमित साटम यांना मिळणार उमेदवारी?

By मनोहर कुंभेजकर | Updated: March 14, 2024 16:46 IST

अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात अमित साटम यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता

मनोहर कुंभेजकरमुंबई-उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात गेली दोन टर्म येथे गजानन कीर्तिकर हे खासदार आहेत.मात्र ही जागा शिंदे गटाकडून घेण्यात भाजपाला यश मिळाल्याची चर्चा आहे.गेली दोन टर्म येथे गजानन कीर्तिकर हे खासदार आहेत.येथून महाविकास आघाडीची ही जागा कोण लढणार?आणि अधिकृत उमेदवार कोण असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 मात्र येथून अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार अमित साटम यांना महायुतीचा उमेदवार म्हणून उमेदवारी मिळण्याची मतदार संघात चर्चा आहे.शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात अमित साटम यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काल सायंकाळी भाजपाने राज्यातील 20 उमेदवारांची यादी जाहिर केली होती.यामध्ये उत्तर पश्चिम मुंबई,दक्षिण मुंबई,उत्तर मध्य मुंबई येथील उमेदवारांची अजून घोषणा केली नव्हती.

अमित साटम हे 2007 ते 2012,2012 ते 2017 या काळात दोन टर्म नगरसेवक होते,तर 2014 पासून आजमितीस ते दोन टर्म अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार आहेत.तसेच त्यांनी भाजप उत्तर पश्चिम जिल्ह्याचे अध्यक्षपद भूषवले आहे.त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल आणि त्यांचे नाव केंद्रीय समितीला कळवले असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या शनिवारी शिवसेना शाखांच्या भेटी दरम्यान शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती.या मतदार संघात आमदार अमित साटम यांच्या सह वर्सोव्याच्या आमदार डॉ.भारती लव्हेकर आणि गोरेगाव पश्चिमच्या आमदार विद्या ठाकूर असे तीन आमदार असून गेल्या रविवारी आमदार रवींद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.त्यामुळे या मतदार संघात भाजपाची ताकद वाढली असून अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात मराठी अनुभवी चेहरा म्हणून अमित साटम यांच्यात चुरशीची लढत होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

दरम्यान काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी गेल्या मंगळवारी भाजप नेते,राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यामुळे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत निरुपम हे भाजपात प्रवेश करतील आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवतील अशी राजकीय वर्तुळात आणि मतदार संघात चर्चा आहे.मात्र निरुपम यांना भाजपात घेण्यास पक्ष नेत्यांचा तसा नकार आहे.त्यामुळे भाजप कडून या मतदार संघाची माहिती असलेले आमदार अमित साटम यांना उमेदवारी मिळू शकते अशी माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.