Join us
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातील दारूभट्टी केली उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2015 22:42 IST

रोहा तालुक्यातील तांबडी येथील जंगलात बेलवाडी गावानजीक गावठी दारूच्या भट्ट्या राजरोसपणे चालू होत्या. याप्रकरणी धडक कारवाईत तांबडीच्या खोल जंगलात

रोहा : रोहा तालुक्यातील तांबडी येथील जंगलात बेलवाडी गावानजीक गावठी दारूच्या भट्ट्या राजरोसपणे चालू होत्या. याप्रकरणी धडक कारवाईत तांबडीच्या खोल जंगलात जाऊन गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. रोहा पोलिसांनी केलेल्या कारवाईत हरिश्चंद्र राघो झोरे, दिनेश कोंडू शिंदे, उमेश रामा गोरे, यशवंत झोरे, गंगाराम रामा झोरे यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बेलवाडी गावानजीक असणाऱ्या जंगल भागात शेणवीरा नाल्यालगत जवळपास ३० ते ३५ गावठी दारूच्या भट्ट्या लावल्या जात होत्या. या ठिकाणी गावठी दारूच्या हातभट्ट्या आणि गुळमिश्रित रसायन मोठ्याप्रमाणावर आढळून आले. दारूच्या भट्ट्या आणि गुळमिश्रित रसायनाचे पिंप या कारवाईत पोलिसांकडून फोडण्यात आली आहेत.यापूर्वी देखील रोहा पोलिसांकडून दारूभट्ट्यांविरोधात कारवाई करण्यात आली होती. परंतु पोलिसांची पाठ वळताच या विभागातील दारूभट्ट्या पुन्हा जोमाने सुरू होत असल्याचे यापूर्वीच्या कारवायांमध्ये दिसून आले आहे.या मोहिमेत सुमारे २४००० किमतीचा माल नष्ट करण्यात आला. गावठी दारू बनविणारे आणि विक्री करणाऱ्यांविरोधात या पूर्वी देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु शिक्षा होण्याचे प्रमाण नगण्य आहे.