मुंबई : सीएसटी स्थानकात मध्य रेल्वेकडून वायफाय सेवा उपलब्ध केली जाणार असतानाच आता पश्चिम रेल्वेकडूनही आपल्या स्थानकांवर ही सेवा देण्याचा निर्णय झाला आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल टर्मिनसवर येत्या दोन महिन्यांत वायफाय सेवा उपलब्ध केली जाणार असून त्यावर काम सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. सध्या मोबाइल अॅपचा काळ असून अनेकांच्या हाती मोठमोठ्या कंपन्यांचे अँड्रॉइड फोन असतात. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर लाखोंच्या संख्येने वावरणारे प्रवासीही अँड्रॉइड फोन हाताळताना दिसतात. या फोनमध्ये असणारी इंटरनेट सुविधा ही प्रवाशांसाठी सोयीची ठरते आणि त्याचा वापरही अधिक होताना दिसतो. परंतु स्थानकांवर किंवा लोकलमध्ये नसलेल्या वायफाय सुविधेमुळे कधीकधी इंटरनेट कनेक्शनमध्येही समस्या निर्माण होते. हे पाहता प्रवाशांना इंटरनेट कनेक्शन विनाअडथळा, मोफत आणि तेही जलद सेवा देणारे मिळावे यासाठी सीएसटीसारख्या गर्दीच्या स्थानकावर वायफाय उपलब्ध केले जाणार आहे. सध्या सीएसटी स्थानकात वायफायसाठी २५ राऊटर्स बसविण्यात आले असून त्याची चाचणी सुरू आहे. सीएसटी स्थानकात ही सेवा दिली जात असतानाच आता मुंबई सेंट्रल टर्मिनसवरही वायफाय सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. येत्या दोन महिन्यांत ही सेवा दिली जाणार असून त्यावर काम केले जात असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेवरील अहमदाबाद स्थानकात वायफाय सेवा उपलब्ध करण्यात आली असून सुरुवातीचे अर्धा तास वायफाय मोफत आहे. त्याच धर्तीवर मुंबई सेंट्रल टर्मिनसवरही वायफाय देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)च्सीएसटी स्थानकात सुरू करण्यात येणारे वायफायही सुरुवातीला अर्धा तास मोफत असणार आहे. त्यानंतर शुल्क आकारतानाच २५ रुपयांपुढील कूपनची विक्री केली जाणार आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसवरही दिले जाणारे वायफाय सुरुवातीला अर्धा तास मोफत असेल. च्मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून वायफाय सेवा दिली जात असतानाच कोकण रेल्वेकडूनही मडगाव स्थानकांसह अन्य गर्दीच्या स्थानकांवर वायफाय दिले जाईल.च्मुंबई सेंट्रल टर्मिनसनंतर वांद्रे टर्मिनसवरही ही सेवा उपलब्ध केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई सेंट्रल टर्मिनसवर वायफाय सेवा
By admin | Updated: May 19, 2015 00:31 IST