Join us

पत्नी पीडितांनी केली 'पिशाच्ची मुक्ती'ची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 20:47 IST

पत्नीच्या जाचामुळे त्रस्त झालेल्या पत्नी पीडितांनी पुरुषांच्या हक्कांबाबत जनजागृतीसाठी गत आठवड्यात वाराणसी येथे पिशाच्ची मुक्ती पूजेद्वारे अभिनव आंदोलन केले.

- संकेत सातोपेमुंबई : पत्नीच्या जाचामुळे त्रस्त झालेल्या पत्नी पीडितांनी पुरुषांच्या हक्कांबाबत जनजागृतीसाठी गत आठवड्यात वाराणसी येथे पिशाच्ची मुक्ती पूजेद्वारे अभिनव आंदोलन केले. औरंगाबाद येथील पत्नी पीडित पुरुष आश्रम, मुंबईतील वास्तव फाऊंडेशन, नागपूरमधील जेंडर इक्वॅलिटी संस्था आणि पुण्यातील मेन्स राइट्स या संस्थांसह देशभरात पुरुषांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या ४५ स्वयंसेवी संघटनांचे सुमारे १५० पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.पिशाच्च या पुलिंगी शब्दाऐवजी वैवाहिक आयुष्यात छळ करणा-या स्त्रियांचे प्रतीक म्हणून पिशाच्ची मुक्ती असे आंदोलनाचे नाव ठेवण्यात आले होते. या वेळी काही जणांनी त्यांच्या कजाग पत्नींच्या नावे प्रतीकात्मक पिंडदानही केले. पुरुषांच्या हक्कांसाठी काम करणा-या देशभरातील संघटना सेव्ह इंडियन फॅमिली (एसआयएफ) या मंचाद्वारे अशा अभिनव पद्धतीने आंदोलने करतात. आतापर्यंत वटपौर्णिमेच्या दिवशी वडाऐवजी पिंपळाला उलट प्रदक्षिणा घालून, तसेच दस-याच्या दिवशी रावण दहनासोबतच शूर्पणकेचे नाक कापून महिलांकडून होत असलेल्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठविण्यात आला आहे.संसदेच्या अधिवेशनात कौसी मतदारसंघाचे खासदार हरिनारायण राजभर यांनी पुरुष हक्क आयोग स्थापन करण्याची मागणी केली होती. वाराणसीतील आंदोलनादरम्यान या मागणीला पाठिंबा देण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.------------------आता नोटा आंदोलनकोणत्याही राजकीय पक्षाकडे पुरुषांच्या हक्कांबाबत ठोस धोरण नाही. तसेच पुरुषांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कोणत्याही पक्षाकडून मदत केली जात नाही. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये नोटाचा पर्याय वापरून याचा निषेध करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्याच्या निवडणुकांमध्येही एसआयएफने नोटाद्वारे निषेध व्यक्त करण्यासाठी प्रचार केला होता. त्याचा फटका भाजपाच्या अनेक उमेदवारांना बसला आहे. त्यातून बोध घेऊन आता तरी सरकारने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन मुंबईतील वास्तव फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित देशपांडे यांनी केले आहे.