Join us
Daily Top 2Weekly Top 5

पतीला जेवणातून विष देणाऱ्या पत्नीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:06 IST

मुंबई : कौटुंबिक कलहातून पतीला जेवणातून झुरळ मारण्याचे औषध देणाऱ्या ५५ वर्षीय पत्नीला धारावी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रिटा ...

मुंबई : कौटुंबिक कलहातून पतीला जेवणातून झुरळ मारण्याचे औषध देणाऱ्या ५५ वर्षीय पत्नीला धारावी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रिटा देवी असे पत्नीचे नाव आहे. यात पती भोलेनाथ गिरी (६२) थोडक्यात वाचला असून सायन रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

धारावीच्या शहीद भगत सिंह मार्गावर गिरी राहण्यास असून तो टॅक्सी चालक आहे. कौटुंबिक कलहातून तो गेल्या ८ वर्षांपासून पत्नीसोबत राहत नव्हता. एक मजली असलेल्या घरात वरच्या मजल्यावर पत्नी दोन मुलांसोबत राहते. तर खालच्या खोलीत गिरी एकटाच राहतो. २०१९ पासून तो कारागृहात होता. २७ जून रोजी तो कारागृहातून बाहेर आला.

३० जून रोजी तो घरी आला तेव्हा रीटा तेथे आली व त्याची विचारपूस करत त्याला जेवण दिले. जेवणादरम्यान घर विकण्यावरून दोघांमध्ये वाद झाले. याच वादादरम्यान रिटाने जेवणात झुरळ मारण्याचे औषध टाकल्याचे सांगितले. गिरीने तात्काळ सायन रुग्णालय गाठले. तेथे त्याला उलट्या सुरू झाल्या. मात्र, वेळीच रुग्णालयात पोहोचल्यामुळे त्याचे प्राण वाचले. धारावी पोलिसांनी गिरीच्या तक्रारीवरून रिटाविरुद्ध गुन्हा नोंदवत तिला अटक केली आहे.