मुंबई : महिलांना प्रसधानगृहांच्या वापरासाठी शुल्क आकारले जात असतानाच, मध्य रेल्वेने पुरुषांच्या मुतारीसाठीही एक रुपया शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला व त्याची काही स्थानकांवर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. यात सीएसटी स्थानकात शुल्क आकारणी काही दिवसांपूर्वी बंद केलेली असतानाच, सोमवारपासून पुन्हा एकदा आकारणीस सुरुवात झाली. त्याला प्रत्यक्षात प्रवाशांनीच विरोध केला आणि शुल्क देण्यास नकार दिला. एकूणच या घटनेनंतर रेल्वे प्रवासी संघटनांनी वाय-फाय की युरिनल यातील प्राथमिकता ओळखावी, असा सवाल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना केला आहे. प्रवाशांची प्रवासात गैरसोय होऊ नये, म्हणून स्थानकांतील प्लॅटफॉर्मवर प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात महिला प्रवाशांना प्रसाधनगृहांचा वापर करताना शुल्क आकारण्यात येते. मात्र, पुरुष प्रवाशांकडून प्रसाधनगृहातील मुतारींचा वापर करताना शुल्क आकारले जात नाही. हे पाहता मुतारींची देखभाल-दुरुस्ती करता यावी आणि प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांचे महत्त्व समजावे, यासाठी सर्व स्थानकांवर असलेल्या पुरुष मुतारींसाठी एक रुपया आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्यात काही स्थानकांवर केली जात असून, ठाण्यासारख्या गर्दीच्या ठिकाणीही १0 आॅक्टोबरपासून अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली. ठाणे स्थानकात प्रवासी आणि कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांमध्ये शुल्क देण्यावरून वाद होताना दिसतात. ही स्थिती ठाणे स्थानकात असतानाच, सोमवारपासून सीएसटी स्थानकात पुरुषांच्या मुतारीसाठी पुन्हा शुल्क आकारणीस सुरुवात झाली. मात्र, याला प्रवाशांनीच विरोध केला आणि शुल्क न देण्याचा निर्णय घेतला. प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवा, सुविधा द्या, मगच शुल्क आकारणी करा, अशी मागणीही केली. प्रवाशांचा विरोध पाहताच कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी ही आकारणी मागे घेतली. या संदर्भात उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघाचे प्रमुख संघटक नंदकुमार देशमुख यांनी सांगितले की, शुल्क आकारणीला आमचा विरोध आहे. हा विरोध कायम असून, प्रथम सुविधा द्या, ही आमची मागणी आहे. प्रवासी संघटना म्हणून आम्ही ही मागणी रेल्वेमंत्र्यांना टिष्ट्वटही केले आहे. रेल्वेमंत्र्यांनी प्रवाशांची प्राथमिकता ओळखावी, असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे, रेल्वे यात्री संघाचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनीही प्रवाशांची प्राथमिकता रेल्वेमंत्री सुरेश प्रभंूनी ओळखणे गरजेचे असल्याचे म्हटले. वाय-फाय की युरिनल यातील प्राथमिकता कोणती हे त्यांनी ओळखावे, अशी मागणीही त्यांनी केली. आम्ही या शुल्क आकारणीला विरोध करत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
वाय-फाय की युरिनल?
By admin | Updated: November 8, 2016 03:01 IST