मुंबई : रेल्वे प्रवाशांना स्थानकांवर जलद आणि मोफत इंटरनेट सेवा मोबाइलवर उपलब्ध व्हावी, यासाठी रेल टेल कॉर्पोरेशन आणि गुगलतर्फे वायफाय सेवा सुरू करण्यात आली. मुंबई सेंट्रल स्थानकात ही सेवा सुरू झाल्यानंतर आता मध्य रेल्वेच्या मेन लाइन, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या आणखी पंधरा उपनगरीय रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून त्याला मंजुरी देण्यात आली असून १५ आॅगस्टपर्यंत सर्व स्थानकांवर वायफाय सेवा सुरू होईल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली. रेल्वे टेल आणि गुगलमार्फत वायफाय सुविधा पुरवण्यात येत आहे. २0१८ पर्यंत देशभरातील एकूण ४00 स्थानकांवर वायफाय सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातील सुरुवातीला १00 स्थानकांवर टप्प्याटप्प्याने वायफाय सेवा २0१६ पर्यंत देण्यात येणार आहे. वायफाय सुविधेचा पहिला मान हा मुंबई सेंट्रल स्थानकाला मिळाला. या स्थानकात वायफाय सुविधा २0१६ च्या जानेवारी महिन्यात सुरू झाली. मात्र त्यानंतर अन्य स्थानकांवर वायफाय सुविधा सुरू करण्यासाठी मुहूर्त मिळाला नाही. अखेर १५ उपनगरीय स्थानकांवर वायफाय सुविधा सुरू करण्याच्या निर्णयाला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. २१ एप्रिल २0१६ रोजी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत मुंबईतील काही स्थानकांवर १५ आॅगस्टपर्यंत वायफाय सेवा देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली होती.त्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून वायफाय सुविधा सुरू करण्याला मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)मुंबई सेंट्रल स्थानकात वायफाय सुविधा मिळत आहे. अन्य स्थानकांवरही सेवा सुरू होताच त्याच पद्धतीने सुविधा मिळेल. सेटिंगमधून वायफाय निवडा. त्यानंतर रेलवायर डॉट कॉमवर ब्राऊजर सुरू करा. त्यानंतर स्क्रीनवर फोन नंबर टाइप करा आणि रिसिव एसएमएस प्रेस करा. एसएमएसच्या माध्यमातून चार डिजीटचे एक ओटीपी कोड मिळेल आणि हा कोड वायफाय लॉगिन स्क्रीनवर एंटर करा आणि त्यानंतर मोफत वायफाय सेवा मिळेल.
उपनगरीय रेल्वे स्थानकांवर वायफाय
By admin | Updated: July 16, 2016 03:39 IST