Join us
Daily Top 2Weekly Top 5

का येत नाहीत तृतीयपंथी जी. टी. रुग्णालयात उपचारांसाठी ?

By संतोष आंधळे | Updated: February 7, 2024 10:25 IST

वर्षभरात ५१ जण ओपीडी, तर ७ उपचारार्थ दाखल.

संतोष आंधळे, मुंबई : राज्यात प्रथमच तृतीयपंथींच्या उपचारासाठी जे. जे. रुग्णालयाच्या अखत्यारीतील गोकुळदास तेजपाल (जीटी) रुग्णालयात गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये स्वतंत्र वॉर्ड सुरू केला आहे. यामध्ये ३० बेडची व्यवस्था आहे. हा वॉर्ड सुरू होऊन वर्ष झाले; मात्र वर्षभरात केवळ ७ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले, तर ५१ रुग्णांनी बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) उपचार घेतले. त्यामुळे या वॉर्डबाबत आणखी जनजागृती करण्याचे काम तृतीयपंथी समुदायातील प्रमुख व्यक्तींकडून सुरू करणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

३ फेब्रुवारी २०२३ मध्ये जी. टी. रुग्णालयात तृतीयपंथींसाठी वॉर्ड सुरू केल्यानंतर या विषयाची राज्य आणि देशभर चर्चा सुरू होती. तृतीयपंथी समुदायातूनसुद्धा याचे जोरदार स्वागत केले होते. त्यावेळी तृतीयपंथी समुदायासाठी काम करणाऱ्या गौरी सावंत, सलमा खान यावेळी उपस्थित होत्या. हा वॉर्ड सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच पुणे येथील ससून रुग्णालयातसुद्धा अशाच प्रकाराचा तृतीयपंथींच्या उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू केला होता. सार्वजनिक रुग्णालयात तृतीयपंथींसाठी स्वतंत्र वॉर्ड असावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून समुदायाकडून होत होती. त्याची दखल घेत या वॉर्डाची सुरुवात केली होती. या विशेष कक्षात येणाऱ्या तृतीयपंथींवर उपचारासाठी अद्ययावत सुविधा निर्माण केल्या आहेत.

वॉर्ड १३ मध्ये विशेष कक्ष :

  ‘तृतीयपंथींसाठी राज्यात प्रथमच स्वतंत्र वॉर्ड’ या आशयाचे वृत्त प्रथम ‘लोकमत’मध्ये ३० ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध झाले होते. अनेकवेळा सार्वजनिक रुग्णालयात तृतीयपंथी ज्यावेळी उपचारासाठी जातात, त्यावेळी त्यांच्याकडे इतर रुग्णांप्रमाणे बघणे अपेक्षित असताना त्यांना हीन दर्जाची वागणूक मिळते. 

  या स्वतंत्र वॉर्डमुळे त्यांना त्रास सहन करावा लागणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर वॉर्ड क्रमांक १३ मध्ये हा विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. या विशेष कक्षात येणाऱ्या तृतीयपंथींवर उपचार करण्यासाठी अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. २ व्हेंटिलेटर, मॉनिटर, सेमी आयसीयू यासह येथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

 तृतीयपंथी समुदाय संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उपचारासाठी केवळ त्यांना दक्षिण मुंबईतील जी. टी. रुग्णालयात जाणे अनेकांना जमत नाही. त्यामुळे शासनाने पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये दोन बेड्स तृतीयपंथींसाठी आरक्षित ठेवले पाहिजेत. - सलमा शेख, माजी उपाध्यक्ष

वर्षभरात सात तृतीयपंथी समूहातील रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी दाखल झाले होते. त्यामध्ये चार रुग्ण मेडिसीन विभागातील, तर तीन रुग्ण सर्जरी विभागाशी संबंधित होते, तर ५१ रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतले आहेत. या वॉर्डबाबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था म्हणून या वॉर्डची निर्मिती केली आहे.- डॉ. भालचंद्र चिखलकर, अधीक्षक, जी.टी. रुग्णालय

टॅग्स :मुंबईहॉस्पिटलट्रान्सजेंडर