Join us  

सर्दी, खोकल्यासाठी औषधी घ्यायची कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 10:04 AM

हवामान बदलामुळे बहुतांश घरात एखाद्या व्यक्तीला तरी सर्दी, खोकला, ताप आणि घसादुखीचा त्रास होत आहे.

मुंबई :  गेल्या काही महिन्यांत वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहे. संध्याकाळी वातावरण थंड असते तर दिवसा गरम असते. या हवामान बदलामुळे बहुतांश घरात एखाद्या व्यक्तीला तरी सर्दी, खोकला, ताप आणि घसादुखीचा त्रास होत आहे. या अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला न घेताच  नागरिक औषधे घेत असतात. आपल्याला आजाराची तीव्रता बघून औषधे घ्यायला हवी. प्रत्येक वेळीच औषधे घेतली पाहिजे असे काही नाही, काही वेळा एक-दोन दिवसात कोणतेही औषध ने घेता सर्दी, खोकला बरा होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. 

...तर डॉक्टरांना दाखवा एक-दोन दिवसात खोकला कमी झाला नाही किंवा प्रत्येक १५ ते २० मिनिटांनी खोकला येत असेल तर डॉक्टरांना दाखविणे गरजेचे आहे. तसेच अनेकवेळा सर्दी-खोकला झाल्यानंतर पिवळा किंवा हिरवा कफ बाहेर पडत असेल तर डॉक्टरांना दाखविले पाहिजे. श्वास घेण्यास त्रास होत असेल तेव्हा मात्र तत्काळ डॉक्टरांना दाखविणे गरजेचे आहे. 

थंडीच्या दिवसात सर्दी-खोकला खूप प्राथमिक आजार आहे. प्रत्येक घरात हा आजार आहे. त्यामुळे तत्काळ गोळी घेतलीच पाहिजे, असे काही नाही. काही वेळा एक-दोन दिवसात आराम केल्यानेसुद्धा हा आजार बरा होतो. काही जण मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या घेतात. काहींना त्याने बरे वाटते. मात्र एक-दोन दिवसात आजार बरा नाही झाला तर मात्र डॉक्टरांना दाखविणे गरजेचे आहे. सध्याच्या बदललेल्या वातावरणामुळे साधा सर्दी, खोकला येणाऱ्या रुग्णाची संख्या वाढली आहे. डॉ. जलील पारकर, लीलावती हॉस्पिटल

सर्दी, खोकला :  सध्या व्हायरल आजाराची साथ सुरू आहे. त्यामुळे अनेकांना सर्दी-खोकला येत असल्याचे चित्र पाहायला दिसत आहे. नागरिकांनी एक-दोन दिवस वाट पाहावी. जर बरे नाही वाटले तर डॉक्टरकडे जावे. प्रत्येक छोट्या आजारासाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासत नाही.    

अंगदुखी : अनेकांना या काळात अंगदुखीचा त्रास होत असतो. एक-दोन दिवस आराम केल्यानंतर अनेकांना बरे वाटत आल्याचे दिसून येत आहे. 

डोकेदुखी : नागरिकांना या काळात डोकेदुखी होते. त्यावेळीसुद्धा अनेक वेळा तत्काळ गोळी घेतली जाते. 

टॅग्स :मुंबईसंसर्गजन्य रोग