गाडी चालवताना फोनवर बोलणाऱ्या उबर ड्रायव्हरच्या बेमुर्वतखोर वर्तनाचे वृत्त लोकमतने गेल्या मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध केल्यानंतर यानिमित्ताने या टॅक्सी चालकांचे वर्तन आणि प्रवाशांची सुरक्षा हे मुद्दे ऐरणीवर आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने विचार केला तर गाडी चालवताना फोनवर सातत्याने बोलणे एवढ्यापुरतीच ही गोष्ट मर्यादित नाही, तर या चालकांच्या अन्य सवयीदेखील तितक्याच घातक आहेत.
काहीवेळा ड्रायव्हर बुकिंग उचलतात आणि प्रवासी बसल्यावर आपल्याला तेथे जायचे नाही असे सांगतात. अलीकडच्या काळात संबंधित प्रवाशाने जे बुकिंग केले आहे ते कुठले केले आहे आणि त्याकरिता किती पैसे मिळणार आहेत, याची माहिती ड्रायव्हरला मिळते. आधी तशी व्यवस्था नव्हती; मात्र आता ही व्यवस्था उपलब्ध असूनही ड्रायव्हर बुकिंग स्वीकारतात आणि ऐनवेळी नकार देतात. अशा स्थितीत त्यांनी बुकिंग रद्द करणे अपेक्षित असते; मात्र त्यावेळी देखील ते मुजोरी करतात. कारण त्यांनी बुकिंग रद्द केले तर त्यांचे पैसे कापले जातात आणि प्रवाशाने बुकिंग रद्द केले तर त्याचे पैसे कापले जातात. प्रवासी घाईत असल्यामुळे वादावादीपेक्षा बुकिंग रद्द करतात. काहीवेळा ड्रायव्हर एसी लावण्यासही मनाई करतात. काहीवेळा ड्रायव्हर इंधन भरायचे आहे, अशी बतावणी करून रोखीने पैसे देण्याचा आग्रह धरतात किंवा सरळ मी अॅप बंद करतो मला तेवढेच पैसे रोखीने द्या असे सांगतात.
गाडीत प्रवास सुरू झाल्यानंतर जर ड्रायव्हरने असे सांगितले तर अशावेळी प्रवासी सुरक्षेची जबाबदारी कुणाची, असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. वास्तविक ओला-उबर कंपन्यांची वाहन चालकांसाठी एक नियमप्रणाली आहे. ती पाळणे हे त्यांचे कर्तव्य आहे. अर्थात कंपनीला प्रत्येक चालकावर लक्ष ठेवणे जमेलच असे नाही. अशावेळी प्रवाशांनी अधिक पुढाकार घ्यायला हवा. या कंपन्यांच्या अॅपमध्ये काही अडचण आली किंवा चालकांमुळे त्रास झाला तर त्याची तक्रार करण्याची सुविधा आहे. जाऊ दे, होता है, चलता है म्हणत किंवा वेळेअभावी अनेक प्रवासी तक्रारी करत नाहीत. या अॅपमध्ये पोलिसांना थेट फोन करण्याचीही सुविधा आहे. त्यामुळे प्रसंगानुरूप अशी पावले प्रवाशांनी उचलणे गरजेचे आहे. कारण शेवटी हे प्रकार आपल्या सुरक्षेशी निगडित आहेत आणि तो आपला हक्क आहे. अशा घटनांची वेळोवेळी नोंद केली तर किमान या वाहन चालकांच्या वर्तनाला आळा बसण्यास मदत होईल.