Join us

गणेशोत्सवासाठी शिवसेना लपून-छपून बैठका का घेतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:06 IST

मुंबई : सव्वाशे वर्षांहून जुन्या गणेशोत्सवावर बंदी घालण्याचे प्रकार सध्या राज्यात सुरू आहेत. गणेशोत्सवाबाबत सर्वपक्षीय बैठक घेण्याऐवजी सेना भवनात ...

मुंबई : सव्वाशे वर्षांहून जुन्या गणेशोत्सवावर बंदी घालण्याचे प्रकार सध्या राज्यात सुरू आहेत. गणेशोत्सवाबाबत सर्वपक्षीय बैठक घेण्याऐवजी सेना भवनात शिवसेनेकडून चोरी चोरी छुपके छुपके बैठका का घेतल्या जात आहेत, असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच गणेशोत्सव समन्वय समिती, महासंघ यांना विश्वासात न घेता , कोणत्याही प्रकारची चर्चा, बैठक न घेता उत्सवाची नियमावली एकतर्फी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत गणेशोत्सव मंडळांमध्ये प्रचंड संताप, संभ्रम आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने याबाबत सर्वपक्षीय बैठक घेणे आवश्यक आहे. तसे न करता सेना भवनात बैठका का घेतल्या जात आहेत? कसली लपवाछपवी सुरू आहे? असा सवाल आशिष शेलार यांनी केला. गणेशाच्या मूर्तीच्या उंचीवर निर्बंध घालून कोरोना कसा रोखणार आहात, असा प्रश्न करतानाच गर्दीचे अन्य नियम आम्हाला मान्य आहेत. पण घरातील मूर्तीची उंची सरकार का ठरवते आहे, असे शेलार म्हणाले.

गणेश मूर्तिकारांनी सरकारने नियमावली जाहीर करण्यापूर्वीच मूर्ती तयार केल्या होत्या. खरे तर ही बाब सरकारने लक्षात घेऊन यापूर्वीच त्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना देणे आवश्यक होते, पण तसे घडले नाही. एकतर्फी नियमावली जाहीर करण्यात आली. त्यामुळे मूर्तिकारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना राज्य सरकारने मदत देणे आवश्यक आहे. म्हणून सर्वपक्षीय बैठक घेऊन या सर्व बाबींचा विचार मुख्यमंत्र्यांनी करणे आवश्यक आहे, असेही शेलार यांनी सांगितले.