Join us
Daily Top 2Weekly Top 5

जामीन फेटाळूनही साहिलला अटक का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मी बॉडीबिल्डर असल्याने मानसिकदृष्ट्या मजबूत असूनही आत्महत्येचा प्रयत्न केला, यावरून माझ्यावर असलेल्या दबावाची कल्पना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मी बॉडीबिल्डर असल्याने मानसिकदृष्ट्या मजबूत असूनही आत्महत्येचा प्रयत्न केला, यावरून माझ्यावर असलेल्या दबावाची कल्पना तुम्ही करू शकता, अशा शब्दांत शुक्रवारी ‘मिस्टर इंडिया’ पुरस्कार प्राप्त मनोज पाटील (२९) यांनी पत्रकारांसमोर स्वतःची व्यथा मांडली. तसेच साहिल खानचा जामीन फेटाळल्यानंतरही त्याला अटक का करण्यात आली नाही, असा सवाल मुंबई पोलिसांना करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा अभिनेता साहिल खान याला अटक करण्याची मागणी करण्यासाठी पाटील हे अन्य खेळाडू आणि बॉडीबिल्डरांसोबत साडेबाराच्या सुमारास ओशिवरा पोलीस ठाण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत साहिलला अटक करावी, अशी विनंती केली. साहिलचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्याचे मोठमोठ्या राजकारण्यांशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे मुंबई पोलीस त्याला अद्याप अटक करीत नसल्याची खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली. साहिलच्या अटकेमुळे त्यांच्या प्रमाणे अनेक खेळाडू व बॉडीबिल्डरना न्याय मिळेल, असेही ते म्हणाले. पोलिसांनी दोन दिवसांत साहिलला अटक न केल्यास आंदोलनाचा इशारादेखील दिला.