Join us  

...म्हणून मुंबईच्या समुद्रकिनारी आढळतात मृत डॉल्फिन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 5:00 AM

मुंबईच्या समुद्र किनारी मागील दोन दिवसांपासून डॉल्फिन मृतावस्थेत आढळत आहेत. यामागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी ‘लोकमत’ने तज्ज्ञांशी संवाद साधला असता...

मुंबई : मुंबईचा समुद्र किनारा हा पूर्णत: प्रदूषित झाला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, किनाऱ्यापासून दहा किलोमीटर आत समुद्र प्रदूषित झाला असून, याचा फटका जलचरांना बसत आहे. महत्त्वाचे म्हणजे, डॉल्फिनसारख्या माशालाही या प्रदूषणाचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना जिवाला मुकावे लागत आहे.मुंबईच्या समुद्र किनारी मागील दोन दिवसांपासून डॉल्फिन मृतावस्थेत आढळत आहेत. यामागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी ‘लोकमत’ने तज्ज्ञांशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की, समुद्रातील प्रदूषण, तसेच पर्ससीन नेट आणि एलईडी लाइटच्या मदतीने केल्या जात असलेल्या मासेमारीचा फटकादेखील माशांना बसत असून, यात डॉल्फिनचाही जीव जात आहे. परिणामी, प्रथमत: अशा मासेमारीवर बंदी घालावी. सोबतच समुद्र प्रदूषित होणार नाही, याची काळजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह मत्स्य विभागाने घेणे गरजेचे आहे.मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांनी या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, जून आणि जुलै महिन्यात मासेमारीला बंदी असते. मात्र, तरीही मोठमोठ्या बोटींकडून मासेमारी केली जाते. कालच बोर्डीला एक बोट बुडाल्याची घटना घडली. मोठ्या बोटी या पर्सिसन नेट आणि एलईडी लाइटच्या मदतीने मासेमारी करतात. समुद्रात जेव्हा मासेमारीसाठी एलईडी लाइट सोडली जाते, तेव्हा ती माशांवर पडल्यास मासा अर्धमेला होतो.शिवाय अशा प्रकाराची मासेमारी करताना रसायनांचा आधार घेतला जातो. पर्सिसन नेट आणि एलईडीच्या मदतीने मासेमारी करताना मोठ्या बोटींच्या कचाट्यात जेव्हा डॉल्फिन मासा सापडतो, तेव्हा समजा तो मेला, तर मोठ्या बोटी त्याला सोबत घेत नाहीत. कारण डॉल्फिनला पकडणे किंवा त्याची मासेमारी करणे हा गुन्हा आहे. परिणामी, असा मासा जाळ्यातून बाहेर काढून पुन्हा समुद्रात फेकला जातो आणि हाच मासा मृतावस्थेत समुद्र किनारी लागतो. मुंबईच्या समुद्र किनारी नेमके हेच घडते आहे.मागील एका वर्षात मुंबईच्या समुद्र किनारी किमान पन्नास मृत डॉल्फिन मासे आढळले आहेत. दुसरे असे की, समुद्रातील प्रदूषण वाढते आहे आणि हे प्रदूषणदेखील माशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत आहे. परिणामी, समुद्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.पर्यावरणाचे अभ्यासक कौस्तुभ दरवेस यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईपासून करंजापर्यंत जो समुद्र किनारा आहे, तो मृतावस्थेत आहे. येथे जलचर आढळत नाहीत आणि आढळले, तर त्यांना समुद्रातील प्रदूषणाचा धोका आहे. मुळात मुंबईच्या समुद्र किनारी डॉल्फिन आढळत नाहीत. डॉल्फिन अलिबागच्या समुद्रकनारी आढळतात. स्वच्छ पाणी त्यांना आवडते. समुद्रातील विहारादरम्यान येथे एखाद्या डॉल्फिनचा मृत्यू झाला, तर तो पाण्याच्या प्रवाहामुळे मुंबईच्या समुद्र किनारी वाहून येतो.प्राणी आणि पक्षीमित्र सुनीश कुंजू यांच्या मते, मुळात मुंबईचा समुद्र हा पूर्णत: प्रदूषित झाला आहे. पाण्यातील प्रदूषणाचा जलचरांना त्रास होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मत्स्य विभागाने याबाबत सारासार विचार करत कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, आपल्याकडे या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते, अशी खंतही कुंजू यांनी व्यक्त केली.समुद्रात मासेमारीसाठी एलईडी लाइट सोडली जाते, तेव्हा ती माशांवर पडल्यास मासा अर्धमेला होतो. शिवाय अशा प्रकाराची मासेमारी करताना रसायनांचा आधार घेतला जातो. ही रसायनेही माशांसाठी घातक ठरतात.डॉल्फिनला पकडणे किंवा त्याची मासेमारी करणे हा गुन्हा आहे. परिणामी, असा मासा जाळ्यातून बाहेर काढून पुन्हा समुद्रात फेकला जातो आणि हाच मासा मृतावस्थेत समुद्र किनारी लागतो.किनाºयापासून 10 किलोमीटर आत समुद्र प्रदूषित झाला असून, याचा फटका जलचरांना बसत आहे.मागील एका वर्षात मुंबईच्यासमुद्रकिनारी किमान 50मृत डॉल्फिन मासे आढळले आहेत.पाण्यातील प्रदूषणाचा जलचरांना त्रास होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मत्स्य विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.

टॅग्स :मुंबईनिसर्ग