मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेट वे ऑफ इंडियावरून सुटलेल्या प्रवासी बोटीची दुर्घटना ही समुद्रातील वस्तुस्थिती दर्शविणारी घटना असून, मच्छीमारांना तर अशा दुर्घटनांना सातत्याने सामोरे जावे लागते. यामध्ये मुंबई, पालघर, डहाणू, वसई, उत्तन, रायगड या सागरी विभागांतील मासेमारी नौकांना टक्कर देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा दुर्घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक वेगळे नियंत्रण कक्ष निर्माण करावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
किनारटपट्टीवरील कुठल्याही जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडल्या, तर बाधित मच्छीमारांना मुंबईतील येलो गेट पोलिस ठाण्याला धाव घ्यावी लागते. तिथेही योग्य न्याय मिळण्यास दिरंगाई होते. अशा दुर्घटनेत जीवितहानी, तसेच मासेमारी बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशा प्रकरणांत स्थानिक पोलिस स्टेशन, भारतीय तटरक्षक दल अथवा भारतीय नौदलाकडून कसलेच सहकार्य मिळत नाही. यात वेळ निघून गेल्यामुळे पंचनामे वेळेवर होत नाहीत आणि मच्छीमारांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागते, अशी माहिती त्यांनी दिली.
अशा दुर्घटनांसाठी राज्य सरकारने एक वेगळे नियंत्रण कक्ष स्थापन करायला हवे. या नियंत्रण कक्षामध्ये सागरी पोलिस दल, मत्स्यव्यवसाय विभाग, भारतीय नौसेना आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांचा समाविष्ट करावे आणि त्याबाबत नवीन नियमावली तयार करावी, अशी अपेक्षाही तांडेल यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दुर्घटना स्थळी यंत्रणांना त्वरित कामाला लावणे, पंचनामा करणे, त्याआधारे गुन्हे दाखल करून सुनावणी घेणे, आदी बाबींचा समावेश नियमावलीमध्ये करणे अनिवार्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.