Join us  

धारावीत आहेत तरी किती झोपड्या; सर्वेक्षणात कोण होणार पात्र-अपात्र?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 10:40 AM

पुनर्विकास प्रकल्पाला राजकीय पक्षांसह संघटनांचा विरोध. 

मुंबई :धारावी पुनर्विकास प्रकल्पाला काही राजकीय पक्षांसह काही संघटनांकडून जोरदार विरोध केला जात असतानाच दुसरीकडे धारावीतल्या सर्वेक्षणाचे काम सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे. सुमारे ७ ते ८ महिने झोपड्यांचे सर्वेक्षण केले जाणार असून, झोपड्यांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. पहिल्या दिवशी सर्वेक्षण सुरळीत झाल्याचा दावा प्रकल्पाच्या वतीने करण्यात आला तरी धारावीतल्या संघटनांनी याविरोधात भूमिका घेतली आहे.

धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सांगितले की, आज महत्त्वाचा दिवस आहे. सरकारतर्फे प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणून सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. युनिक आयडी दिला जात आहे. सोशल इकोनॉमिक सर्वे केला जाईल. कुटुंबाची माहिती घेतली जाईल. टॅबमध्ये माहिती गोळा केली जाईल. धार्मिक स्थळे, झोपड्या, माळ्यावरील बांधकामे असा सर्व सर्वे केला जाईल. त्यांनाही नंबर दिला जाईल. रहिवाशांनी माहिती द्यावी. आपला नंबर येतो की नाही? हे रहिवाशांनी तपासावे. प्रत्येक बांधकामाला युनिक आयडी दिला जाईल. रहिवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. धारावी प्रकल्पातील हा मैलाचा दगड आहे. रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन आहे.

प्रत्येक झोपडीला दिला क्रमांक -

१) धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि राज्य सरकारतर्फे सर्वेक्षण सुरू आहे.

२) कमला रमणनगर येथून सर्वेक्षणाला सुरुवात झाली.

३) प्रत्येक झोपडीला क्रमांक देण्यात येईल. त्यानंतर  संबंधित गल्लीचे  लेसर मॅपिंग केले जाईल. त्याला लिडार सर्व्हे असे म्हणतात.

४) कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी एक टीम ॲपसह प्रत्येक झोपडीला भेट देणार आहे.

५) प्रकल्पात पात्र आणि अपात्र सदनिकाधारकांनाही घरे मिळणार आहेत.

टॅग्स :मुंबईधारावी