Join us

वसई महापालिका कुणाकडे ?

By admin | Updated: June 15, 2015 23:34 IST

महानगरपालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक रविवारी झाली. मंगळवारी सकाळी मतमोजणी होणार आहे. आता सर्वांचे निकालाकडे लक्ष लागले

वसई : महानगरपालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक रविवारी झाली. मंगळवारी सकाळी मतमोजणी होणार आहे. आता सर्वांचे निकालाकडे लक्ष लागले असून ३६७ उमेदवारांमध्ये धाकधुक आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणूक यंत्रणेनेही मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या निघणाऱ्या मिरवणुका लक्षात घेता पोलीस यंत्रणेनेही वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले आहे.वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. ४८.८७ टक्के मतदान झाले. एकूण ६ लाख ८७ हजार ३२० मतदारांपैकी १ लाख ८६ हजार १९० पुरुष तर १ लाख ४९ हजार ८३० महिलांनी मतदान केले. एकूण १११ जागांसाठी मतदान झाले. महानगरपालिकेच्या ११५ जागांपैकी ४ जागांवर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. यावर्षी प्रथमच सेनेने बहुजन विकास आघाडीसमोर आव्हान उभे केले होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे नियोजन व निवडणूक यंत्रणा राबवण्याचे कसब यामुळे सेनेने बऱ्यापैकी मुसंडी मारली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना प्रचारामध्ये विशेष कामगिरी बजावता आली नाही. सेनेचे आदित्य ठाकरे व काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे प्रचारासाठी वसई-विरारच्या दौऱ्यावर आले होते. आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने ही निवडणूक लढविली असली तरी त्यांना प्रभावी प्रचार यंत्रणा राबवणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत कितपत यश मिळेल, याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही खात्री नाही. पालकमंत्री विष्णू सवरा आणि खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांनी आपापल्या परीने प्रचार केला परंतु या प्रचारात जोश नव्हता. ज्यांना विजयाची खात्री आहे अशा उमेदवारांनी ढोल, ताशा, बँडवाले व नाशिक बाजाची बुकींग पूर्वीच करून ठेवली आहे. (प्रतिनिधी)