सांगली : राज्याला व देशाला ज्यांनी सहकाराचा मंत्र दिला, त्या वसंतदादा पाटील यांच्या नावाचाच कारखाना बंद पाडण्यात आला. आता कर्ज भागविण्यासाठी कारखान्याची जागा विकावी लागत आहे, हे पाहून स्वर्गीय वसंतदादांना काय वाटत असेल?, असा सवाल उपस्थित करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथे राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात वसंतदादांच्या वारसदारांवर टीका केली. पोलीस मुख्यालय परिसरातील सभागृहात हा मेळावा पार पडला. यावेळी जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या अवस्थेवर पवार यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, जिल्ह्याला राष्ट्रवादीने अनेक महत्त्वाची पदे दिली. सिंचन योजना, सहकारी संस्था व अन्य विकास कामांसाठीही आवश्यकता वाटेल तेव्हा अपेक्षेपेक्षा जास्त निधी दिला. कधीही दुजाभाव केला नाही. तरीही जिल्ह्यातील सहकाराची अशी अवस्था का झाली? वसंतदादा कारखाना आम्ही बंद पाडला का? यशवंत, तासगाव आणि जतचे कारखाने कुणी बंद पाडले? वसंतदादांनीच राज्याला सहकार शिकविला आणि त्यांच्याच नावाचा कारखाना आज बंद पडत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कारखान्यांचे ज्यांनी वाटोळे केले, तेच आता दुसऱ्या पक्षात चालले आहेत. सांगली महापालिकेत जयंत पाटील यांची सत्ता होती, तोपर्यंत चांगले चालले होते. आता महापालिका क्षेत्राची वाट लागली आहे. राष्ट्रवादी पक्ष सोडणारे संधी मिळाली नसल्याची टीका करत आहेत. वास्तविक प्रत्येकालाच पक्षात संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात गेल्या पंधरा वर्षात सर्वाधिक पदे सांगलीला मिळाली. गृह, अर्थ, ग्रामविकास अशी महत्त्वाची खाती या जिल्ह्याला मिळाली. महामंडळे, महत्त्वाच्या वित्तीय संस्था, विधानपरिषदेची आमदारकी अशा प्रत्येक पातळीवर पक्षाने नेत्यांना, कार्यकर्त्यांना संधी दिली. पृथ्वीराज देशमुखांनी माझ्या समोर येऊन सांगावे की, त्यांना कोणतीही संधी पक्षाने दिली नाही. आता जिल्ह्यातील असे नेते ज्या पक्षांमध्ये जाऊ पहात आहेत, त्या पक्षांच्या निर्णयप्रक्रियेत पश्चिम महाराष्ट्रातील एकही नेता नाही. उद्धव ठाकरे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांच्या हातीच पक्षाच्या दोऱ्या आहेत. त्यामुळे ते पश्चिम महाराष्ट्राला कितपत न्याय देतील, याबाबत शंका वाटते.आघाडीबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. दोन्ही गोष्टींची आमची तयारी आहे. आघाडी झाली तर सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, तासगाव-कवठेमहांकाळ, जत मतदारसंघासह अन्य जागांबाबत आग्रह करणार आहोत, असे पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, आ. मानसिंगराव नाईक, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष इलियास नायकवडी, माजी आमदार रमेश शेंडगे, विलासराव शिंदे, दिनकर पाटील, जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, पक्षनिरीक्षक अशोक स्वामी, उषा दशवंत उपस्थित होते. (प्रतिनिधी)मस्ती आली आहे का?महायुतीचे खासदार आता आया-बहिणींचा अवमान करीत आहेत. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एका मुस्लिम कर्मचाऱ्याचा उपवास मोडण्याचे कृत्य त्यांनी केले. केंद्र्रात सत्ता आली म्हणून शिवसेना खासदारांना इतकी मस्ती आली आहे का?, असा सवाल अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला. ठाकरेंचे कार्य काय?शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्याचे नेतृत्व करू शकतात का? राज्यातील एखाद्या प्रश्नाची त्यांना जाण तरी आहे का? एकही संस्था त्यांनी उभी केलेली नाही. सत्ता असूनही मुंबई महापालिकेची त्यांनी वाट लावली, अशी टीका पवार यांनी केली.नायकवडी-जयंतरावांचे ‘मिले सूर मेरा तुम्हारा...’काही वर्षांपूर्वी एकमेकांचे राजकीय शत्रू बनलेले जयंत पाटील व राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष इलियास नायकवडी यांनी आज निर्धार मेळाव्यात ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चा अनुभव कार्यकर्त्यांना दिला. ‘बात उसी दिन बन जाती, पर हमें कहना नही आया और उन्हे सुनना नही आया’, असा शेर सादर करून नायकवडींनी परिस्थिती मांडली. जयंतरावांनीही नायकवडींच्या भाषणबाजीला दाद दिली. मनोमीलन महापालिका निवडणुकीपूर्वीच घडले असते, तर निकाल वेगळाच लागला असता, असे मत पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी व्यक्त केले.
वसंतदादा कारखाना कुणी बंद पाडला?
By admin | Updated: August 11, 2014 23:34 IST