दिपक मोहिते , वसईपालघर विधानसभा मतदारसंघ १९७२ पर्यंत सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होता. १९७८ मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाला. या मतदारसंघात अनुसूचित जमातीच्या वर्गाची लोकसंख्या सर्वाधिक असल्यामुळे हा मतदारसंघ आजतागायत त्याच गटासाठी आरक्षित ठेवला आहे. आता पालघर हा आदिवासी जिल्हा झाल्यामुळे या मतदारसंघाची ओळख कायमस्वरूपी राहणार आहे. गेल्या ५३ वर्षात एकूण १२ विधानसभा निवडणुका झाल्या. या सर्व निवडणुकांमध्ये पालघरवासीयांनी काँग्रेस व सेनेला प्रत्येकी ५ वेळा तर प्रजासमाजवादी पक्ष व जेएनपी या पक्षांना प्रत्येकी १ वेळा संधी दिली. सध्या हा मतदारसंघ २००९ ते २०१४ चा एकमेव अपवाद वगळता १९९० पासून सेनेच्या ताब्यात आहे.२००९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांनी सेनेचा हा गड भेदला परंतु यंदाच्या निवडणुकीत सेनेने कृष्णा घोडा यांना उमेदवारी दिली व चौरंगी लढतीत त्यांनी गावित यांचा ५४२ मतांनी पराभव केला. परंतु घोडा यांच्या अकाली निधनानंतर आता ही पोटनिवडणुक होत आहे. ही निवडणुक जिंकण्यासाठी सेना, काँग्रेस व बहुजन विकास आघाडी अशा तिघांमध्ये लढत होईल. गेल्या निवडणुकीमध्ये युती तुटल्यामुळे भाजपने आपला उमेदवार रिंगणात उतरवला होता. तरीही सेनेने अटीतटीच्या लढतीमध्ये विजय मिळवला. पुढील महिन्यात ही पोटनिवडणुक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजप उतरण्याची शक्यता नाही. युतीचे सरकार असल्यामुळे सेना व भाजप युतीच्या माध्यमातूनच ही लढाई लढतील. दुसरीकडे बहुजन विकास आघाडीनेही ही जागा प्रतिष्ठेची केली असून कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकायचीच या दृष्टीने ते प्रयत्नाला लागले आहेत. दुसरीकडे काँग्रेस कडून राजेंद्र गावित यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजपचा उमेदवार रिंगणात नसल्यामुळे गेल्या निवडणुकीत त्यांचे उमेदवार डॉ. प्रेमचंद गौंड यांना मिळालेली ३४ हजार १४९ मतांवर कोणाची मक्तेदारी राहील हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. ही मते सेनेच्या पारड्यात जातात की इतर पक्षामध्ये विभागली जातात यावर सारे काही अवलंबुन आहे.गेल्या काही वर्षात पालघर तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न आजही प्रलंबित असून अनेक गावांना दर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. आरोग्य, शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा व पाणीपुरवठा या क्षेत्रामधील विकासकामांना गेल्या १० वर्षात गती मिळू शकली नाही. अशा परिस्थितीत पालघरवासीयांवर परत एकदा पोट निवडणुकीला सामोरे जाण्याची पाळी आली आहे. यावेळी पालघरवासीय मतदार परिवर्तन करतात का? सध्याच्या पक्षाला पुढे चाल देतात हे पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.
पालघरचा किल्लेदार कोण?
By admin | Updated: June 19, 2015 21:55 IST