मुंबई : मुंबई महापालिकेतील नालेसफाई घोटाळा उघड झाल्यानंतर रस्ते दुरुस्तीच्या घोटाळ्याची मागणी खुद्द महापौरांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. महापौरांच्या मागणीचे पत्र बाहेर येताच विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागली आहे. यामध्ये सत्तेत असलेल्या भाजपानेही रस्ते घोटाळ्याची मागणी केल्याने श्रीमंत पालिकेच्या तिजोरीवर सत्ताधाऱ्यांपैकी नक्की कोण डल्ला मारतंय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ते चौकशीच्या मागणीवर सेनेने अद्याप कोणतीच भूमिका जाहीर न केल्याने मुंबईकरांचे लक्ष सेनेच्या भूमिकेकडे लागले आहे.महापौरांच्या रस्ते घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीनंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अॅड. आशिष शेलार यांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेऊन रस्ते घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली होती. शिवाय रस्त्यावरील डांबर कंत्राटदार खातात की काय? ही मुंबईकरांच्या मनातील शंका चौकशीअंती दूर करा, अशी विनवणीही शेलार यांनी या वेळी केली होती. या भेटीला दोन दिवस उलटत नाहीत तोवर राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनीही रस्ते घोटाळ्याप्रकरणी सेना-भाजपावर टीकेची झोड उठविली आहे. महत्त्वाचे म्हणजे महापौरांच्या पत्रावर भाजपा, काँग्रेस आणि मनसेने तोंडसुख घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही प्रशासनातील सर्वच खात्यांमधील भ्रष्टाचाराची मागणी केली आहे.मुंबई महापालिका हद्दीतील रस्ते बांधणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याची कबुली देत आयुक्तांमार्फत त्याची चौकशी करण्याची मागणी केल्याबद्दल महापौर स्नेहल आंबेकर यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे सचिन अहिर यांनी म्हटले आहे. नालेसफाई आणि रस्ते बांधणीच नव्हे तर महापालिकेच्या जवळपास प्रत्येक विभागात मोठा भ्रष्टाचार आहे. ही बाब आम्ही गेली अनेक वर्षे सांगत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला कुणाचा?
By admin | Updated: October 5, 2015 00:30 IST