मुंबई : राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असून त्यात कोणकोणते नवे चेहरे असतील या बाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणूक १३ महिन्यांवर असताना आपल्या विश्वासातील काही व्यक्तींना मंत्री करण्याचा विचार मुख्यमंत्री करू शकतात. मुख्यमंत्र्यांच्या नजीकचे म्हणून डॉ.संजय कुटे, डॉ.अनिल बोंडे, प्रशांत बंब, परिणय फुके, राजेंद्र पटणी या आमदारांकडे बघितले जाते.
भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर कुटे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल, असे मानले जाते. बुलडाणा जिल्ह्यातील मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार व मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांची नियुक्ती विदर्भ विकास मंडळाच्या अध्यक्षपदी काही महिन्यांपूर्वी करण्यात आली. मात्र, त्यांनी अद्याप सूत्रे हाती न घेता नाराजी कायम ठेवली आहे. असे असले तरी कुणबी समाजाचे असलेले कुटे यांना मंत्रिपद मिळेल, अशीच शक्यता दाट आहे. विदर्भातील दोन मंत्र्यांना वगळले जाऊ शकते तसे झाले तर बोंडे आणि फुके यांचे नाव मंत्रीपदासाठी समोर येईल. भाजपाच्या मित्र पक्षांमध्ये केवळ रासपाचे महादेव जानकर यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद आहे तर विनायक मेटे (शिवसंग्राम) यांच्याकडे शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद असून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा आहे. तथापि, रामदास आठवले (रिपाइं) यांना केंद्रात राज्यमंत्री पद मिळालेले असले तरी राज्यात त्यांच्या पक्षाला मंत्रिपद मिळू शकलेले नाही. रिपाइंला मंत्रिपद देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कालच दिले आहे.
माळी समाजाला प्रतिनिधीत्व द्यायचे तर भाजपाकडे अतुल सावे, मनीषा चौधरी, भीमराव धोंडे देवयानी फरांदे आणि योगेश टिळेकर ही विधानसभा सदस्यांची नावे आहेत. त्यात सावे यांना संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. उद्या भाजपा-शिवसेनेची युती झाली नाही तर सावे यांना औरंगाबादमध्ये भाजपाकडून लोकसभेच्या रिंगणात उतरविले जाऊ शकते. नाशिक जिल्ह्यात भाजपाचा एकही मंत्री नाही. तेथे देवयानी फरांदे यांना संधी देण्याचे ठरले तर सावे यांचा पत्ता कटू शकेल. मात्र, माळी समाजाला दोन मंत्रीपदे द्यायचे ठरले तर सावे यांच्या व्यतिरिक्त फरांदे किंवा अन्य तिघांपैकी एकाचा नंबर लागेल.बाहेरून आलेल्यांनाही संधी मिळण्याची शक्यताबंजारा समाजालाही भाजपाकडून सध्याच्या मंत्रिमंडळात स्थान नाही. या समाजाला प्रतिनिधीत्व द्यायचे ठरले तर तुषार राठोड यांचे नाव आहे.अन्य पक्षांतून भाजपामध्ये आलेल्यांपैकी किसन कथोरे, डॉ. अनिल बोंडे, अमल महाडिक यांच्यापैकी एकाला मंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.