Join us

पोलीस आयुक्तालयाचा डीव्हीआर गायब करण्यामागे कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:07 IST

सचिन सावंत यांनी केली चौकशीची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातून डीव्हीआर गायब झाला. त्यामागे ...

सचिन सावंत यांनी केली चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातून डीव्हीआर गायब झाला. त्यामागे तत्कालीन आयुक्त आहेत का, याची चौकशी एनआयएने करावी. ते करत नसल्यास राज्य सरकारने चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी शनिवारी केली.

१० मार्चला मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसराचा डीव्हीआर एटीएसने अधिकृतरीत्या ताब्यात घेतला; परंतु दोनच तासांत एटीएसचे प्रमुख जयजितसिंह यांना परमबीर सिंग यांच्या कार्यालयातून फोन गेला, सदर डीव्हीआरमध्ये स्पष्ट दिसत नाही, तो तपासून परत देऊ, असे म्हणत परत मागवण्यात आला. त्यानंतर डीव्हीआर गायब झाला आहे. या प्रकाराची एनआयए चौकशी का करत नाही, असा सवाल सावंत यांनी विचारला. डीव्हीआरमध्ये स्कॉर्पिओ, इनोव्हा गाड्यांची ये-जा, सचिन वाझे व इतर कोणाच्या संपर्कात होते, हे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे महत्त्वाचा पुरावा गायब केला, हे स्पष्ट आहे. तरीही गेल्या १८ दिवसांत एनआयएने वाझेच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला जबाबासाठी बोलावले नाही, हे आश्चर्यकारक असल्याचे सावंत यांचे म्हणणे आहे. भाजपने सिंग यांच्या चौकशीची मागणी करणे थांबवले आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन हत्या याकडून दुसरीकडे लक्ष जावे, हा भाजपचा प्रयत्न असल्यानेच इतर प्रकरणांवर आरोप केले गेले, असा दावाही सावंत यांनी केला.