Join us  

शिक्षक विद्यादान करत असताना शिक्षक श्रेणीच्या नवीन निकषांना विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 6:26 AM

मुंबई : शिक्षक विद्यादान करत असताना त्यांना १२ वर्षे आणि २४ वर्षे सेवा पूर्ण झाल्यावर वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्यात येते.

मुंबई : शिक्षक विद्यादान करत असताना त्यांना १२ वर्षे आणि २४ वर्षे सेवा पूर्ण झाल्यावर वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्यात येते. पण, शालेय शिक्षण विभागाने या श्रेणीसाठी लावलेले नवीन निकष हे जाचक असल्यामुळे राज्यभरातील शिक्षक याला विरोध करीत आहेत. शाळेचा निकाल, शाळेच्या गे्रडवर श्रेणी देण्याचा निर्णय घेणे अयोग्य असल्याचे मत शिक्षक संघटांनांनी व्यक्त केले आहे.२३ आॅक्टोबरला दिलेल्या शासन निर्णयानुसार, वरिष्ठ श्रेणी (१२ वर्षे) आणि निवड श्रेणी (२४ वर्षे) पात्र होण्यासाठी शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण आणि पगारवाढ करण्यासाठी संबंधित शाळा सिद्धी अ ग्रेड आणि नववी आणि दहावीचा निकाल ८० टक्के असणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. ही अट काढून टाकावी यासाठी हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे उदय नरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये शाळा ‘अ’ दर्जाची असावी यात दुमत नाही. पण भौगोलिक साधने, आर्थिक निकष, संस्थाचालक यामुळे जर शाळेला ‘अ’ ग्रेड प्राप्त होत नसेल तर यात शिक्षकाचा दोष काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे.मुंबई महानगर पालिका ‘टक्केवारी’ निकष पाहणार का? ज्या विभागात अनधिकृतपणे बांधकाम होत आहेत, फेरीवाले आहेत त्या विभागातील अधिकारी, नगरसेवक, प्रभाग समिती अध्यक्ष व संबंधित कर्मचारी वर्गाची बढती, पगारवाढ रोखून ठेवणार का? या सर्वांचे प्रमुख म्हणून मुंबई महानगर पालिका आयुक्त याचीही पगारवाढ थांबवणार का? असे प्रश्नही नरे यांनी उपस्थित करुन शिक्षकांनाच हा न्याय का असेही म्हटले आहे.अन्य शिक्षक संघटनांनीही या निर्णयाला विरोध केला आहे. या निर्णय मागे घ्यावा यासाठी राज्यभरात विविध संघटनांनी आंदोलने सुरु केली आहेत. शिक्षकांना मिळणारी श्रेणी या जाचक अटीमुळे मिळणार नाही, असे शिक्षकांचे स्पष्ट मत आहे.

टॅग्स :शिक्षक