Join us

'श्री शिवाजी मंदिर'चा तिढा कधी सुटणार? शिवजयंतीनंतर चर्चेला बोलावणार! 

By संजय घावरे | Updated: February 5, 2024 20:55 IST

अद्याप काहीच हालचाल नसल्याचे नाराज नाट्यनिर्मात्यांचे म्हणणे.

मुंबई - तिकिट दर ५०० रुपये केल्यास नाट्यगृहाचे भाडे दीडपट आकारण्याच्या विरोधात काही नाट्यनिर्मात्यांनी १ जानेवारीपासून श्री शिवाजी मंदिरमध्ये नाटकांचे प्रयोग न करण्याची भूमिका घेतली. फेब्रुवारी सुरू झाला तरी यावर तोडगा निघालेला नाही. शिवजयंतीनंतर नाराज नाट्यनिर्मात्यांना चर्चेसाठी बोलवणार असल्याचे संकेत श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिले आहेत. या गदारोळात शिवाजी मंदिरमध्ये उर्वरीत व्यावसायिक नाटकांसोबतच विविध कार्यक्रम सुरू आहेत.

१ जानेवारीपासून शिवाजी मंदिरमध्ये प्रशांत दामलेंची गौरी थिएटर, दिलिप जाधव यांची अष्टविनायक, संतोष शिदम यांची मल्हार, विजय केंकरेंची प्रवेश, मिहिर गवळींची रॅायल थिएटर, निनाद कर्पेंची बदाम राजा प्रॉडक्शन, अजय कासुर्डेंची सरगम क्रिएशन, नंदू कदम यांची सोनल प्रॉडक्शन या निर्मिती संस्थांची नाटके झाली नाहीत. या निर्मात्यांनी अपेक्षित तारखा न मिळाल्याने जानेवारी-मार्च या तिमाहीतील तारखा परत केल्या. याबाबतच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर १० जानेवारीला श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाने पत्रकार परिषद घेत लवकरच नाराज निर्मात्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. यासोबतच निर्मात्यांनी परस्पर प्रयोगांच्या तारखांची अदलाबदल करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले, पण महिना होत आला तरी निर्मात्यांना चर्चेला बोलावलेले नाही. यावर 'लोकमत'शी बोलताना ब्रिगेडियर सावंत म्हणाले की, काही निर्मात्यांनी तारखा परत केल्या असल्या तरी नाट्यगृहात नियमित कार्यक्रम सुरू आहेत. व्यावसायिक नाटकांसोबतच प्रयोगिक नाटके, नवीन नाटकांच्या तालिमी आणि इतर गीत-संगीताचे कार्यक्रम झाले. निर्मात्यांनी परत केलेल्या तारखा इतर निर्मितीसंस्थांना दिल्या आहेत. शिवजयंती म्हणजेच १९ फेब्रुवारीनंतर नाराज नाट्यनिर्मात्यांना चर्चेसाठी बोलावले जाऊ शकते. यापूर्वी त्यांच्या मागणीनुसार ५०० रुपये तिकिट दर आकारल्यास नाट्यगृहाचे भाडे दुप्पट करण्याचा निर्णय मागे घेऊन दीडपट केला होता. यावरही काहीतरी तोडगा निघेल अशी आशाही सावंत यांनी व्यक्त केली. उद्भवलेल्या या परिस्थितीचा उर्वरीत निर्मिती संस्थांना फायदा झाल्याचे नाट्य व्यवसाय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

याबाबत निर्माते दिलीप जाधव म्हणाले की, अद्याप मंडळाकडून कसलाही निरोप आलेला नाही. ५०० रुपये तिकिट केल्यास महाराष्ट्रात कुठेही नाट्यगृहाचे भाडे दीडपट केले जात नसताना श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहाने घेतलेला निर्णय योग्य नाही. यामुळे श्री शिवाजी मंदिरच्या प्रेक्षकांना लोकप्रिय नाटकांसाठी दूर जावे लागत असल्याचेही जाधव म्हणाले..........................जानेवारीमध्ये श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात आमने सामने, करून गेलो गाव, अलबत्या गलबत्या, राजू बन गया झेंटरमेन, मी नथुराम गोडसे बोलतोय, पुन्हा सही रे सही, माझ्या बायकोचा नवरा, कुर्रर्रर्र, चूक भूल द्यावी घ्यावी, २१७ पद्मिनी धाम, संज्या छाया (काँन्ट्रॅक्ट) आदी व्यावसायिक नाटकांचे प्रयोग झाले. यासोबतच कोकणचे नमन, जागर, बंदिश, रामायण, नवीन नाटकांच्या तालिमी असे कार्यक्रम झाले.  

टॅग्स :मुंबई