Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुसरा डोस मिळणार तरी कधी? नागरिकांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:06 IST

मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्र सरकारने कोविशिल्डच्या पहिल्या डोसनंतर दुसरा डोस आता ३ ते ४ महिन्यांनी ...

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : केंद्र सरकारने कोविशिल्डच्या पहिल्या डोसनंतर दुसरा डोस आता ३ ते ४ महिन्यांनी मिळणार असे जाहीर केले आहे. कोविड -१९ वर्किंग ग्रुपने केलेल्या शिफारसींच्या आधारे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी सुरुवातीला कोविशिल्ड लसीच्या डोसचे अंतर २८ ते ४२ दिवस, मग मार्चमध्ये 42 ते 56 दिवस, आता परत तिसऱ्यांदा सदर डोसचे अंतर ३ ते ४ महिन्यांनी वाढवले आहे.

सध्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस हा ६ ते ८ आठवड्यांच्या अंतराने दिला जातो. आता केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे दुसरा डोस आता आम्हाला कधी मिळणार, असा संभ्रम दुसरा डोस घेणाऱ्या अनेक नागरिकांमध्ये आहे. आज दिवसभर अनेक नागरिकांनी आता आम्हाला दुसरा डोस कधी मिळेल, मुंबई महानगरपालिकेची भूमिका काय आहे, आता आम्हाला तीन ते चार महिन्यांनी दुसरा डोस मिळणार का, असे अनेक सवाल लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्यक्ष व फोन करून आपल्याला विचारले, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या व प्रभाग क्रमांक ७ च्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

याप्रकरणी आता पालिका आयुक्तांनी भूमिका स्पष्ट करावी, दुसरा डोस कधी दिला जाणार याचा खुलासा करून नागरिक व लोकप्रतिनिधींमध्ये असलेला संभ्रम लवकर दूर करावा, अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

याप्रकरणी राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे ‘लोकमत’ने लक्ष वेधले असता, त्यांनी त्वरित पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी संपर्क साधला. याबाबत पालिका प्रशासन एक-दोन दिवसांमध्ये आपली भूमिका स्पष्ट करेल असे त्यांनी सांगितल्याचे डॉ. दीपक सावंत म्हणाले. आपल्याला देखिल अनेक नागरिकांनी आम्हाला आता दुसरा डोस कधी मिळणार, याबाबत विचारणा केली, असे त्यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेने दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व व्याधीग्रस्तांना लसीकरणासाठी वॉक इन पद्धत सुरू केली आहे, तर जी उत्तर वॉर्डमध्ये दि. ४ मे रोजी सुरू केलेल्या ड्राईन इन लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असताना, आता मुंबईत ठिकठिकाणी ही योजना पालिका सुरू करणार आहे. मात्र आता दुसरा डोस हा ६ ते ८ आठवड्यांच्या अंतराने देण्याच्या निर्णयाने पालिका प्रशासन आता लसीकरण मोहीम कशी राबवणार, १८ ते ४४ वयोगटासाठी बंद केलेली लसीकरण मोहीम मग परत कधी सुरू करणार, लसीकरण मोहिमेला ब्रेक लागणार का, असा सवाल आता केला जात आहे.

वसईच्या आरती भाटकर यांनी सांगितले की, दि, ८ एप्रिल रोजी पहिला डोस मी गोरेगावच्या नेस्को लसीकरण केंद्रात घेतला होता, आता केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मग लस मला कधी मिळेल हा प्रश्न आहे.

-----------------------------------------