Join us

अर्नाळ्याचा किनारा डंम्पिंगमुक्त कधी होणार ?

By admin | Updated: April 7, 2015 22:47 IST

महाराष्ट्रातल्या आणि विशेषत: ठाणे मुंबईच्या पर्यटकांचा आवडता असलेल्या अर्नाळा बीच ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे डंम्पिंग ग्राऊंड झाला

अर्नाळा : महाराष्ट्रातल्या आणि विशेषत: ठाणे मुंबईच्या पर्यटकांचा आवडता असलेल्या अर्नाळा बीच ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे डंम्पिंग ग्राऊंड झाला असून आसपासचे रहिवासी त्याचा प्रात:र्विधीसाठी वापर करीत असल्यामुळे येथील पर्यटनापुढे मोठे संकट उभे राहिले आहे.ज्या बीचच्या आकर्षणामुळे पर्यटक येथे येतात. त्या पर्यटकांनाच बीचकडे जाऊ नका असे सांगण्याची पाळी येथे रिसॉर्ट चालकांवर आली आहे. महाराष्ट्रामध्ये हागणदारी मुक्तीची योजना जोरदार सुरू असली तरी येथील ग्रामस्थांच्या अडेलतट्टूपणामुळे व समुद्र आमचा आहे, त्याचा किनारा आमचा आहे, त्याच आम्ही पाहिजे तसा वापर करू, आम्हाला कोणीही अडवू शकत नाही, अशी त्यांची भूमिका असल्यामुळे इतक्या सुंदर किनाऱ्याचा वापर ग्रामस्थ प्रात:र्विधीसाठी करतात. त्यामुळे एकीकडे कचऱ्याची दुर्गंधी आणि दुसरीकडे हागणदारीने ग्रस्त अशा दुहेरी कचाट्यात हा किनारा सापडला आहे. हे संकट टाळण्यासाठी स्थानिकांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. तसेच किनाऱ्यालगतच्या गावांमध्ये हागणदारीमुक्तीची योजना राबविणे आवश्यक आहे. काही ठिकाणी गावातच सार्वजनिक शौचालये उभारूनही हा प्रश्न सुटू शकतो. अर्नाळा ग्रामपंचायतीला पुरेसे उत्पन्न नाही, त्यामुळे डंम्पिंगच्या प्रश्नावर काय करावे? असा प्रश्न आहे. त्यावर आसपासच्या काही गावांसाठी सामूहिक असे डंम्पिंग ग्राऊंड किनाऱ्यापासून लांब अंतरावर उभारल्यास हा प्रश्न सहज सुटू शकेल, त्यासाठी एमएमआरडीए किंवा पर्यटन खाते आणि ग्रामविकास खाते यांनी संयुक्तरित्या प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. एकीकडे पर्यटनाच्या विकासासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे आहे ते पर्यटन नष्ट होण्याची वेळ या स्वच्छतेच्या प्रश्नांमुळे आली आहे. त्याबाबत तातडीने लक्ष घालून उपाययोजना होण्याची आवश्यकता आहे. (विशेष प्रतिनिधी)