Join us

धारावीचा जन्म कधी झाला? कुणासाठी झाला? इंटरेस्टिंग माहिती...

By मनोज गडनीस | Updated: August 18, 2025 18:46 IST

मुंबईच्या मध्यवर्ती भागातील धारावीचा जन्म, तिचा विस्तार, उद्योगधंद्यांची वाढ आणि पुनर्विकासाच्या सतत चर्चेत राहिलेली कहाणी ही अत्यंत रंजक आहे.

मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी

मुंबईच्या मध्यवर्ती भागातील धारावीचा जन्म, तिचा विस्तार, उद्योगधंद्यांची वाढ आणि पुनर्विकासाच्या सतत चर्चेत राहिलेली कहाणी ही अत्यंत रंजक आहे. धारावी आज ६०० एकरांवर विस्तारली असून पुनर्विकास हे तिच्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. 

पुन्हा एकदा पुनर्विकासाची चर्चा सुरू असलेल्या धारावीतून जेव्हा या लेखाच्या निमित्ताने फेरफटका मारला तेव्हा हे काम किती आव्हानात्मक असेल याचे असंख्य विचार मनात आले. पण यानिमित्ताने पहिला विचार मनात आला तो म्हणजे सात बेटांच्या मुंबईत धारावीचा जन्म कधी, कसा आणि का झाला असेल? शोध आणि वाचन केल्यानंतर समजले की आज जवळपास ६०० एकर जागेवर पसरलेली धारावी वर्ष १८८४ मध्ये ब्रिटिश राज्य सत्तेच्या कालावधीमध्ये वसली ती पहिल्यांदा कोळी समाजासाठी. 

कालांतराने मग तेथे चामड्याच्या उद्योगातील लोक येत गेले. त्यानंतर कुंभारपाडा आणि मग मुंबईच्या मध्यवर्ती भागात धारावीचे लोकेशन असल्यामुळे अनेक उद्योग, लघुउद्योग आणि पूरक उद्योगांनी तिथे ठाण मांडले. आज मुंबईच्या विविध भागांत जे उद्योग उभे आहेत त्यांना लागणारा पूरक किंवा कच्च्या मालाच्या निर्मितीचे हब धारावी बनले आहे. 

'आगे दुकान पिढे मकान' ही संकल्पना पहिल्यांदा धारावीतच जन्माला आली. त्यामुळेच व्यवसाय आणि घर अशी धारावी पुनर्विकासासाठी आव्हानात्मक ठरली आहे. धारावीच्या पुनर्विकासाची चर्चा आज होते आहे. पण या चर्चेचा इतिहास देखील रंजक आहे. वर्ष १९५० मध्ये पहिल्यांदा धारावी पुनर्विकासाची चर्चा सुरू झाली आहे आणि १९६० या वर्षी धारावी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची स्थापना झाली. तेथील समाजकारणातील नेते ए.व्ही.दोरायस्वामी यांनी यासाठी मोलाचे प्रयत्न केले. पण प्रकल्प मार्गी लागला नाही. 

एकीकडे पुनर्विकासाचे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे धारावीचा विस्तार सुरूच होता. त्यावेळी धारावीचे आकारमान ४३२ एकर होते. हळूहळू धारावी आपले हातपाय पसरत होती. धारावी किती पसरत होती, याची व्यापकता २००६ यावर्षी यूएनएचडीआरने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समजून घेता येते. "धारावीत प्रती १४४० लोकांसाठी एक स्वच्छतागृह आहे" अहवालातील या एकाच मुद्द्यावरुन आपल्याला तेथील दाहकता लक्षात येईल. २०२५ मध्ये ही आकडेवारी आणखी बदललेली आहे. धारावी लाइव्ह या लेखमालेच्या निमित्ताने तेथील अनेक पैलूंचा वेध घेतला जाणार आहे. ही त्याची सुरुवात आहे. 

कोरोनाकाळात साधनांची निर्मितीकोरोनाकाळात मुंबईकरांना सर्वाधिक धास्ती होती ती धारावीत जर कोरोनाचा ब्लास्ट झाला तर काय होईल? अर्थात ही भीती स्वाभाविक होती. कारण १८९६ मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीने धारावीमध्ये शेकडो लोकांचा बळी गेला होता. तिथली स्वच्छता आजही तितकीच आव्हानात्मक आहे. पण कोरोनाकाळात धारावी तरली. इतकेच नाही, तर कोरोनाकाळात ज्या सुविधा लोकांना लागत होत्या. त्याची निर्मिती देखील धारावीतच होत होती. आणि ती देखील हायजीन राखूनच!

टॅग्स :धारावीमुंबई