मुंबई सेंट्रल बस आगारामधील चालकाने आपल्या वरिष्ठांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली़ मनासारखी ड्युटी मिळत नसल्याने वैतागलेल्या कर्मचाऱ्याने रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे़ मात्र या एका प्रसंगाने बेस्टमधील चालकांची मानसिक अवस्थाच दाखवून दिली़ कामाचा अतिताण, सततचे जागरण, अंत पाहणारी वाहतूककोंडी यातून ‘बेस्ट’ मार्ग काढता काढता त्यांचाही तोल ढासळू लागला आहे़ त्यामुळे ही घटना बेस्टसाठी धोक्याची घंटा आहे़सुरक्षित व स्वस्त प्रवासाबरोबरच बेस्टचा कारभार शिस्तीसाठीही ओळखला जात होता़ चार हजार बसगाड्या ५०० बसमार्गांवर कुठून कुठे व किती वाजता धावणार, याचे गणित आगारात बसलेले अधिकारी वर्षानुवर्षे करीत आले आहेत़ गेल्या दशकभरात बेस्ट उपक्रम कोट्यवधी रुपयांच्या तोट्यात गेले़ वाहतुकीच्या अन्य पर्यायांमुळे बेस्टच्या अनेक बसगाड्या रिकाम्या धावू लागल्या़ रोजच्या उत्पन्नापेक्षा खर्चाचा आकडा वाढला़ त्यामुळे नुकसानीचे बसमार्ग बंद करण्यास बेस्टने सुुरुवात केली़ यासाठी सर्वप्रथम नियोजनबद्ध नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले़ मात्र हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला़ सुधारित वेळापत्रकामुळे चालक व कंडक्टरांचे कामाचे तास वाढतात, ताण वाढतो अशा तक्रारी वाढू लागल्या़ हे वेळापत्रक रद्द होण्यासाठी असहकार आंदोलनही झाले़ परंतु बेस्ट बंद आणि प्रवाशांचे हाल करूनही हा प्रश्न सुटला नाही़ अखेर कर्मचाऱ्यांमध्ये वेळापत्रकाबाबत कुरबुर सुरू असतानाच नवीन पद्धत लागू करण्यात आली, पण शेवटी व्हायचे तेच झाले़ कर्मचारी विशेषत: बस चालकांमध्ये रोष वाढला़ सतत गाडी चालविल्यामुळे चालकांमध्ये मानसिक आणि शारीरिक व्याधी वाढल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे़ त्यात मुंबईतील वाहतूक कोंडीने चालकांच्या त्रासात भर घातली़ नियोजित वेळेतच बस आगारामध्ये न पोहोचल्यास कारवाईच्या भीतीने चालकांमधील बेदरकारपणा वाढला़ परिणामी बेस्ट बसगाड्यांद्वारे अपघातांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येते़ यावर उपाय म्हणून चालकांना मार्गदर्शन, योगा प्रशिक्षिण वर्ग सुरू करण्यात आले़ पण मुंबईच्या वाहतुकीतून मार्ग काढताना असले मार्गदर्शन कामी येते का? दररोज लाखो प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी असलेल्या बसचालकाचे काम जिकिरीचे आहे़ त्यामुळे त्याच्यावर परिणाम करणारे कोणतेही नवीन बदल करताना त्याला विश्वासात घेणे आवश्यक आहे़ सतत गाडी चालवून थकलेल्या चालकांना विश्रांतीसाठी चांगल्या चौक्याही नाहीत़ चांगल्या शौचालयांचीही सोय नाही़ अशाही परिस्थितीत बसगाडी चालविणाऱ्या चालकांची झोपही नवीन वेळापत्रकाने उडवल्याच्या तक्रारी आहेत़ बहुतांशी मुंबईबाहेर असलेल्या चालकांना ड्युटी संपून घरी जाईपर्यंत उशीर होतो़ त्यातच पुन्हा लवकरच्या ड्युटीसाठी घर सोडावे लागत असल्याने शांत झोपही त्यांना मिळेनाशी झाली आहे़ त्यामुळे फुकट सल्ले न देता, कर्मचाऱ्यांसाठी पोषक वातावरण कसे तयार करता येईल, याचाही बेस्ट प्रशासनाने विचार करावा़ याचा अर्थ मुंबईकरांना वेठीस धरणाऱ्या प्रवृत्तीला पाठीशी घालावे असे नव्हे, मात्र बेस्ट बस आज रस्त्यावर असण्यास या चालकांचेही मोठे योगदान आहे़ त्यामुळे त्यांना जपलं तर बेस्ट जपता येईल, हे लक्षात ठेवायला हवे़ (प्रतिनिधी)
बेस्टचालकाची सटकते तेव्हा़!
By admin | Updated: September 8, 2014 02:03 IST